परिचय:
कुळ कायदा म्हणजे कसेल त्याची जमीन या तत्वार कसणा-या माणसाला संबंधीत जमिनीची कायम स्वरुपी मालकी हक्क देण्याचा कायदा म्हणजे कुळ कायदा. तसा हा कायद्या अत्यंत उदार, वेलफेअर स्टेट म्हणजेच कल्याणकारी राज्य या तत्वाला धरुन पारीत करण्यात आला. त्याचे कारणही तसेच आहे. आधिच्या काळात खेड्या पाड्यात राहणारा शेतकरी बिचारा अशिक्षीत होता. थोड्याफार पैशाची गरज पडली की गावातल्या सावकाराकडे जाऊन पैसे घ्यायचा. त्या बदल्यात सावकार शेत गहाण ठेवून घ्यायचा. मग ही गहाण पडलेली जमीन कधीच सुटत नसे. कालांतराने तो सावकार ७/१२ सदरी मालक म्हणून यायचा. अशा प्रकारे शेकडॊ एकर शेतीचा मालक बनलेले सावकार स्वत: जमीन राबत नसत. या जमिनी कुळाला कसायला देत. आणि कुळा कडून खंड वसूल करत. यात बिचारा कुळ अनेक वर्षे शेतीत राबत होता. पण खरी कमाई मात्र सावकार लोक खात होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने १९४८ साली कुळ कायदा पास केला. आणि कसेल त्याची जमीन या तत्वार कसणा-याला मालकी हक्क देण्याचे ठरले. थोडक्यात ख-या मालकाचा मालकी हक्क रद्द करणे, आणि कसणा-याला मालक बनविणे म्ह्णजे कुळ कायदा होय.
कृषक दिन:
वरील कायदा जरी पास झाला तरी त्याची अमंलबजावणी करण्यात बराच घोळ होता. अखेर कायद्यात नव्याने अमेंडमेंट आणले गेले व ०१ एप्रिल १९५७ हा दिवस कृषक दिन म्हणून घोषीत केले. या दिवशी ज्या कुळाचे नाव ७/१२ सदरी कुळ म्हणून असेल तो मानीव मालक (म्हणजेच अटोमेटीक मालक) बनल्याचे घोषीत केले. त्यामुळे अचानक हाहाकर उडाला. जमीनदार, सावकार लोक चिडून गेले. त्यांच्या शेकडो एकर जमिनी रातोरातो हातून गेल्या. कालवर शेतात राबणारा कुळ आता मालक बनला आणि खरा
मालक मात्र बेदखल झाला. ही स्थिती मजूर व राबणा-या वर्गासाठी सुखाची तर जमीन मालकांसाठी दु:खाची होती. यातून पळवाटा काढण्यासाठी अनेक मालकांनी आपल्या कुळाला बोलावून बॅक डेटेड करारनामे बनवुन घेतले. मी कुळच नाही, मी शेत कसतच नाही. मी ताबेदारच नाही. मी १९५७ पुर्वीच ताबा सोडला असे अनेक दस्त बनवुन कुळाचे हक्क डावलण्याचे प्रकार खो-याने झालेत. त्याचे केस आजही म्हणजे २०२५ मध्ये कोर्टात चालू आहेत.
कलम ३२-ग चा अर्ज
वरील तरतुद आली. सगळे कुळ ज्यांचे नाव कृषक दिनी ७/१२ वर कुळ म्हणून होते ते रातोरात मालक बनले. पण हा झाला कायद्याचा भाग. नुसते आदेश असून चालत नाही. त्याची अंमलबजावणी व्हावी लागते. म्हणजेच प्रक्रिया पुर्ण करुन आपले नाव मालक सदरी लावणे जरुरी होते. त्यासाठी जी प्रक्रिया होती ती म्हणजे ३२-ग ची प्रक्रीय़ा. काय आहे ही प्रक्रीया? कुळाने तहसिलदार यांचेकडे अर्ज देऊन कृषक दिनी तो राबत असल्याचा ७/१२ व इतर कागदपत्र दाखल करणे. एकदा ते झाले की तहसिलदार (यांना ट्रायबुनल हे अधिकार प्राप्त असतात) असल्याने ते कुळाचा तपास व इतर प्रकीया करतात, ती अशी. मुळात कुळाने तहसिलदार कडे अर्ज करायचा की तो संबंधीत जागेत कुळ म्हणून राबत आहे. आता कृषक दिनाच्या अटी प्रमाणे तो मालक बनला आहे. तो कुळ म्हणून ही जमीन खरेदी करण्यास तयार आहे. तसेच या जमिनीची जी काही किंमत ठरेल ती भरण्यास तो तयार आहे. अशा प्रकारचा अर्ज लिहून तहसिलदर साहेब यांचे कडे दाखल करणे. सोबतच काही कागदपत्र जोडायचे असतात. त्यातील सगळ्यात महत्वाचे कागद म्हणजे १९५७ चा सातबारा उतारा. या उता-यातील १२ नंबरच्या फॉर्म मध्ये जो पीक पाहणीचा रकाना आहे त्यात कुळाचे नाव कुळ म्हणून असणे अनिवार्य आहे. त्याच
बरोबर इतर हक्कात कुळ म्हणून नाव असणे जरुरी आहे. कारण याच नोंदीच्या आधारे कुळाचा हक्क निर्धारीत होतो. याच्या जोडीला खंडाच्या पावत्या, ताबा असल्याचा पंचनामा किंवा इतर पुरावे. शेत सारा भरत असल्यास त्याच्या पावत्या ही सर्व कागद पत्रे हे ३२-ग च्या अर्जा सोबत जोडणे. हा अर्ज दिला की तहसिलदार साहेब संबंधीत मालकास नोटीस काढून बोलवून घेतात. मालकांनी येऊन आपली बाजू मांडायची असते. त्यात मालक फार फार तर एकच हरकत घेऊ शकतात की हा माणूस माझ्या जमिनीत कुळ नाही. आणि तसे काही पुरावे असल्यास ते दाखल करु शकतात. एकद दोन्ही पक्ष आपापले म्हणने मांडले व पुरावे नि कागद्पत्र दाखल केले की मग सुनावणी होते. सुनावणी व पुरावे याच्या आधारे तहसिलदार साहेब हे ठरवात की अर्जदार हा कुळ आहे की नाही. पुराव्याच्या आधारे एकदा अर्जदार कुळ असल्याचे सिध्दा झाले की मग तसे आदेश केले जातात. आणि अर्जदार यांना कुळ म्हणूण घोषीत केले जाते. तर ही झाली ३२-ग ची प्रक्रीया. या प्रक्रीयेत सर्व पुरावे, दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून कुळ घोषीत होतो.
३२-म चे प्रमाणपत्र
एकदा ३२-ग ची सुनावणी झाली व कुळ घोषीत झाले की मग दुसरा टप्पा सुरु होते. तो म्हणजे ३२-म चे प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र म्हणजे खरेदीदस्तच होय. जेंव्हा आपण एखादी जमीन घेतो तेंव्हा खरेदीखताने घेतो व त्याचा इंडेक्स २ आपल्याला मिळकतो. त्याचा जसा कायदेशीर उपयोग व महत्व आहेत अगदी तसेच महत्व या ३२-म च्या प्रमाण पत्राचे आहे. तर कुळ घोषीत झाला की तहसिलदार साहेब जमिनीचा मोबदला किती याचे पण आदेश काढतात. त्याप्रमाणे अर्जदार म्हणजेच कुळाने संबंधीत रक्कम थेट मालकास देणे. किंवा मालक घेत नसल्यास तहसिल कार्यालयात जमा करणे किंवा त्यांच्या आदेशाने ट्रेजरीत जमा करता येते. थोडक्यात मोबदल्याची ठरलेली रक्कम शासन दरबारी जमा करणे. मग ही रक्कम मालकानी त्यांना हवे तेंव्हा काढून घ्यावी असा हिशेब असतो. एकदा ही रक्कम भरली की त्याची पावती दाखल करणे. त्याच्या आधारे तहसिलदार साहेब अर्जदार म्हणजेच कुळ यांच्या नावे एक मालकी हक्काचे प्रमाण पत्र देतात. त्या प्रमाण पत्राला ३२-म चे प्रमाण पत्र म्हणतात. हे प्रमाण पत्र म्हणजे कुळाने मालका कडून कुळाची जमीन खरेदी घेतली असून मुळ मालकाचा मालकी हक्क संपुर्णपणे संपुष्टात येऊन कुळाचा मालकी हक्क सुरु झाल्याचा कायदेशीर दस्त होय. याची प्रत संबंधीत तलाठी यांना देणे. याच्या आधारे तलाठी संबंधीत ७/१२ वर मालकाचे नाव कमी करुन कुळाचे नाव मालक सदरी घालतात. तसेच या नोंदीचा एक फेरफार घालून तो फेरफार प्रमाणीत करुन घेतात. एकदा फेरफार प्रमाणीत झाला की प्रक्रीया पुर्ण झाली असे मानल्या जाते.
कुळाला बेदखल करणे
जसा हा कायदा कुळाच्या बाजुने आहे तसाच हा कायदा मालकास पण संधी देतो की योग्य कारणे असल्यास कुळाला बेदखल करता येते. त्यासाठी याच कायद्यात अशा काही तरतुदी आहेत की त्या अन्वये कुळाला बेदखल करता येते. जसे की कुळाने जर खंड भरला नसेल तर कुळाला बेदखल करता येते. कलम ३२(र) प्रमाणे कुळाने घेतलेली जमीन स्वत: न कसल्यास बेदखल करता येते. कुळाने शेती शिवाय इतर कामासाठी जमीन वापरली होती हे सिध्द केल्यास कुळ बेदखल होतो. अशा प्रकारे ब-याच तरतुदी आहेत ज्यामुळे कुळाला बेदखल करता येते. पण त्यासाठी एक प्रक्रीया असून तरतुदींचा नीट अभ्यास असावा लागतो. कुळाचे वर्तन त्यात बसणारे असल्यास त्या ग्राऊंड्सवर कुळाला बेदखल करता येते.
कलम -३२(ओ):
जसं की कुळाचे हक्क जर कृषक दिनाच्या आधी निर्माण झाले असल्यास कुळ हा मानीव खरेदीदार बनतो व ती जमीन घेण्याचा त्याचा हक्क बजावतो. त्याच प्रमाणे एकाद्या कुळाचे कुळ म्हणून जे हक्क निर्माण झाले ते जर कृषक दिनाच्या नंतर झाले असतील तर मग काय? याची सुद्धा तरतुद याच कायद्यातील कलम ३२(ओ) मध्ये दिलेली आहे. एखादा माणूस कुळ म्हणून राबतो आहे. पण त्याचा हक्क कागदोपत्री येण्यास उशीर झाला. किंवा खरोखरच तो कुळ म्हणून कृषक दिना नंतर कसू लागला. या केस मध्ये त्याचा हक्क काय? तर वरील कलम असे म्हणतो की ०१.०४.१९५७ नंतर जो माणूस कुळ बनलाय तो ३२-ओ अन्वये कुळ म्ह्णून मालकी हक्क सांगु शकतो व तहसिलदार यांचे कडे अर्ज देऊन कुळाची जमीन विकत घेऊन शकतो. थोडक्यात कृषक दिनानंतरचे कुळ सुध्दा आपला हक्क बजावू शकात व मालकी मिळवू शकतात.
सैनिकाची जमीन:
कुळ कायदा हा कसेल त्याला मालकी देणे व मुळ मालकाचा मालकी हक्क रद्द करणारा कायदा आहे. तरी यात काही अपवाद आहेत. त्यातीलच एक अपवाद म्हणजे सैनिक किंवा माजी सैनिक. एखादा मालकी सैनिक म्हणून देशाच्या सेवेत आहे व त्याची जमीन कुळ कसत असेल. तर या कुळाला कुळ कायद्यान्वये जमिनीची मालकी मागण्याचा हक्क प्राप्त होत नाही. कारण जमीन मालक हा स्वत: न कसण्याचे जे कारण आहे ते अत्यंत महत्वाचे नि देशाच्या सुरक्षीततेशी निगडीत आहे. तो आपली शेती कसायला देऊन आरामात शहरात बसलेला नसतो. त्यामुळे त्याचे मालकी हक्क रद्द करणे न्यायाचे नसेल. इतर सावकार लोकं जमीन कसायला देऊन स्वत: आरामात शहरात बसलेले असायचे. म्हणून त्यांचा मालकी हक्क रद्द करणे योग्य होते. पण सैनिकाच्या बाबतीत हे गैर-लागू आहे. सैनिक स्वत: न कसण्याचे कारण तो देशाच्या सीमेवर बंदूक घेऊन उभा असतो. त्याची जमीन कुळाला देणे म्हणजे मोठा अन्याय होय. म्हणून जर एखादा कुळ सैनिकाची जमीन कसत असेल तर त्या कुळाला मालही हक्क प्राप्त होत नाही. सैनिकाच्या जमिनीवर ३२-ग ची चौकशी होत नाही. तसेच सैनिकाच्या जमिनीचे ३२-म चे प्रमाणपत्र तयार होत नाही. सबब, सैनिकाची जमीन कुळ कायद्यातून वगळण्यात आलेली आहे.
खरेदीखताने हस्तांतरण झाले.
आता सगळ्यात मोठा व महत्वाचा प्रश्न असा आहे की, तुमचे पुर्वाज एखाद्या जमिनीत कुळ म्हणून राबत होते. पण काही कारणास्तव त्यांनी ३२-ग ची प्रकीया न केल्याने व ३२-म चे प्रमाण पत्र न घेतल्याने ७/१२ सदरी आजुनही मुळ मालकाचे नाव आहे किंवा होते. त्याचा फायदा घेउन त्या मालकाने ती जमीन कोणालातरी व्कुन टाकली. तुम्हाला आता कळले की या जमिनीत तुमचे पुर्वज कुळ होते. मग यावर काही उपाय आहे का? होय आहे. जर तुमचे पुर्वज कुळ असलेली जमीन त्रैय्स्थाला विकली असेल तर तुम्ही आजही वारस म्हणून त्या खरेदीखताला कोर्टात आव्हानीत करु शकता. कुळ असल्याचे सिध्द करुन ते दस्त रद्द करु शकता. तसेच संबंधीत जमीन तुम्ही परत मिळवू शकता. त्यामुळे कुळाची जमीन कुळाचे वारस यांची संमती न घेता मालकाने विकली असल्यास अजिबात घाबयाचे कारण नाही. ती जमीन व त्यावरील अधिकार आजही कुळाचे वारस यांचाच असून त्रैयस्थ व्यक्ती त्यावर मालक बनूच शकत नाही.
आजची स्थिती काय आहे?
जर एखाद्या व्यक्तीचे वडिल, आजोबा किंवा पणजोबा एखाद्या शेतात कुळ म्हणून राबत होते. परंतू काही कारणास्तव त्यांनी ३२-ग ची प्रक्रीया करणे राहून गेले. तसेच ३२-म चे प्रमाण पत्र घेणे राहुन गेले. तर आजही त्यांचे वारस १९५७ चा ७/१२ उतारा काढून त्याच्या आधारे मामलेदार/ तहसिलदार यांचे कोर्टात अर्ज देऊ शकतात. तसेच कुळाचे वारस म्हणून त्यांचा जो काही अधिकार व हक्क आहे तो वारस बजावू शकतात. तसेच ज्या जमिनीत पुर्वज कुळ म्हणून राबले त्या जमिनीची मालकी आज वारसांना मिळतो. तशी कायदेशीर तरतूद आहे. त्यामुळे एखाद्याच्या पुर्वजाने कुळ म्हणून राबलेली जमीन आजही क्लेम करता येते. दरम्यानच्या काळात खरेदीखताने जमीन हस्तांतरीत झाली असली तरी ते दस्त रद्द होते व कुळाच्या वारसाला जमीन परत मिळकते. त्यास कायद्याची बाधा येत नाही.
No comments:
Post a Comment