Sunday, 13 April 2025

सात बारा म्हणजे काय?

 

सात बारा म्हणजे काय?

सात बारा म्हणजे शेत जमिनीचा महसुली कागद होय. खर तर यात नमुना ७ नावाचा एक फॉर्म असतो तर नमुना १२ नावाचा दुसरा फॉर्म असतो. हे दोन फॉर्म एकत्र करुन संबंधीत शेत जमिनीची माहिती महसूल अधिकारी दप्तरी ठेवतात. गरज पडेल तेंव्हा संबंधीत शेतक-यास  या फॉर्मचे उतारे काढून देतात. उतारे काढून देणे म्हणजे त्या फॉर्मवर ज्या नोंदी आहेत त्याची नक्कल करुन देणे. तर यातील नमुना ७ चा जो फॉर्म आहे त्याला मुख्य ३ उभे रकाने असतात. पहिला उभा रकाना हा जमिनीचा प्रकार म्हणजेच १) जिरायत २) बागायत ३) तरी व ४) वरकस यातील कोणता प्रकार आहे त्याची नोंद असते. दुस-या  उभ्या रकान्यात भोगवटादार म्हणजेच बोली भाषेतील मालक याची नोंद असते. तर दिस-या उभ्या रकान्यात मात्र इतर हक्काची नोंद असते. हा जो तिसरा रकाना आहे हा सगळ्यात महत्वाचा रकाना आहे. इतर हक्काच्या नोंदी सहसा खालील प्रमाणे असतात. त्या सात बा-यावर असलेला बोजा, कर्ज, गहाण, कुळाची नोंद, वारसांची नोंद, शासकीय आदेशान्वये एखादे संपादन अपेक्षीत असल्यास त्याची नोंद, हस्तांतरणास बंदीची नोंद, वनिकरणाचा शेरा इत्यादी नोंदी असतात. त्यामुळे कोणताही ७/१२ उतारा तपासताना हा रकाना नीट तपासयचा असतो.

 

त्यानंतर खाली नमुना १२ चा फॉर्म जोडलेला असतो. त्यात मात्र पिकाचे प्रकार  व त्या अनुषंगाने माहिती भरलेली असते. तसेच प्रत्येक वर्षीच्या पिकाची नोंद या फॉर्म मध्ये असते. काही एखाद्या वर्षी तुम्ही पीक जर बदलेले असेल्यास तिथे तशी नोंद येते. त्याच बरोबर पिक घेणारी व्यक्ती कोणी त्रयस्थ जर असेल तर त्याचे नाव मात्र या रकान्यात लिहलेले असते. हल्ली हे बंद झालेय. पण जुने ७/१२ तपासल्यास या उता-यात शेती कोण कसतोय याची नोंद दिसते.

No comments:

Post a Comment