Sunday 29 November 2020

जमिनीची ए.बी.सी.डी.

 

जमिनीची एबीसीडी

तसं जमीन सगळ्य़ांकडेच असते(म्हणजे असायची) परंतू जमिनीच्या हक्कांबद्दल अधिकांश लोकांना माहिती अथवा कायदेशीर ज्ञान नसतं. मग या लोकांना कोणीही काहिही स्टोरी सांगतं व त्यांना ते खरं वाटू लागतं, किंवा प्रचंड गोंधळ उडतो. त्यामागे कारण एकच, तुम्हाला जमिनी बद्दल मुलभूत माहिती नसते. मी आज ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो.

जमीनिचा मालक कोण?

अख्या भारतात जमिनीची मालक कोणीच नाही ही गोष्ट सर्वप्रथ मेंदुत कोरून घ्यावी. मग जे जमिनीचे मालक म्हणवतात ते नेमकं कोण आहेत? ते सगळे “भोगवटादार” आहेत. भोगवटादार म्हणजे काय? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६. कलम २(२४) मध्ये “भोगवटा” या शब्दाचा अर्थ कब्जेदार असा दिलेला आहे. म्हणजेच भोगवटादार याचा अर्थ अगदी सरळ व सोप्या भाषेत ताबा बाळगणारा असा होतो. आता तुम्ही आपल्या जमिनीचे/मिळकतीचे कागदं काढून बघा. त्यावर कुठेच मालक असं लिहलेलं नसतं. त्यावर भोगवटादार असं लिहलं असतं व त्यापुढे तुमचं नाव असतं. म्हणजेच ज्याला आपण मालक म्हणतो तो टेक्निकली मालक नसून कब्जेदार असतो. मग मालक कोण असतो? संपुर्ण राज्यातील जमिनीचा मालक सरकार असतो व आपण धारक/कब्जेदार असतो. भोगवटादार हा जमिनीचा कब्जा ठेवतो व त्यातून उत्पादन करतो. त्या बदल्यात सरकारला कर/सिदा/सारा इ. रुपात मोबदला भरत असतो.

जमीन धारणेचा इतिहास

तर जमीन धारणेचा इतिहास काही कमी रंजक नाही. इंग्रजपुर्व काळात भारतात मुघलांचं राज्य होतं व स्थानिक पातळीवर इथले राजे सगळा कारभार पाहात असत. आपल्याकडे आकाऊंटिग व ऑडिटींगची पद्धत फारच कुचकामी होती. वरुन राजे लोकं कोणावरही खुष व्हायचे व जमीनिचा तुकडा इनाम/बक्षीस म्हणून देऊन टाकायचे. हा तुकडा कधी तुकडा असायचा, कधी प्रचंड मोठा जमिनीचा पट्टा असायचा तर कधी अख्ख गावच इनाम देऊन टाकायचे. देशमूख, पाटील व इतर अधिकारपदी असलेल्या लोकांनाही भरभरुन इनामरुपी जमिनी दिलेल्या होत्या. हा सगळा प्रकार शेकडो वर्षे चालू होता.

नंतरच्या काळात हळुच ब्रिटिशांनी देशात शिरकाव केला व एकेक संस्थानांचा ताबा घेत सन १८१८ ला देशातील अखेरचं राज्य ताब्यात घेतलं. पण ते ठरले गोरे साहेब. त्यांना हिशेब पाहिजे होता, अन इकडे कशाचा काही ताळमेळ बसेना. राजे लोकांनी खो-यांनी जमीन इनामी देऊन टाकली होती. शासनकर्ते म्हणून ब्रिटिशांना फारसं उत्पन्न मिळेना. १८१८ ते १८५२ पर्यंत म्हणजेच ३४ वर्षे अभ्यास केल्यावर ब्रिटिशांच्या लक्षात आलं की इथल्या राजे व संस्थानिकांनी लोकांना जमिनी इनामी स्वरुपात देऊन टाकल्या आहेत. त्या परत घेतल्या शिवाय महसूल वाढणे नाही. मग ब्रिटिशांनी इनाम कमिशन नावाचं कमिशन १८५२ रोजी स्थापन केलं. म्हणजे भारतात पहिली रेल्वे धावली त्याच्या बरोबर १ वर्षा आधी. या कमिशनचं काम काय तर समस्त जमीन धारकांना बोलावणे अन विचारणे की “अरे बाबा तुझ्याकडे किती जमीन आहे?” तो सांगणार की इतकी तितकी आहे? मग लगेच दुसरा प्रश्न. बरं ही जमीन तुला कशी मिळाली? तो म्हणणार अमूक राजानी माझ्या पुर्वजांना इनाम दिली. अन मग तिसरा प्रश्न पडायचा तो बाऊन्सर… “ठीक आहे, त्या इनामाचं कागद/सनद दाखव” अन जमीन धारक चक्रावून जायचा. कारण आपल्याकडे इनाम कागदावरच दिलं पाहिजे असा शिरस्त नव्हता. राजा बोले दाडी हाले कारभार होता. कित्येक जमिनी तोंडी इनामी होत्या. आपल्याकडे व्यवहार कागदावर करण्याची प्रथा जरुर होती पण त्यापेक्षाही शब्दाला अधिक मान होता. म्हणून सनदा/बक्षिसपत्र मिळाले असतीलही पण तोंडी व्यवहाराला रुळलेला हा समाज कागद सांभाळून ठेवण्याच्या भानगडीत पडला नाही. अन कमिशननी जो सपाटा लावला त्यात जवळ जवळ ४०% जमीन बिन कागदी निघाली. म्हणजे ही सगळी जमीन आता ब्रिटीश सरकार ताब्यात घेणार. पण जमीन धारकांचा आकाडा इतका मोठा होता की थेट जप्ती चालविल्यास उठाव होण्याची शक्यता होती. मग गो-या साहेबांनी डोकं लावलं नि नविन मार्ग शोधून काढला तो म्हणजे जमीनीचा ताबा तर घ्यायचा पण एकदम नाही. “हळु हळु खायेंगे और थंडा करके खायेंगे” या सुत्रानी चालायचं ठरवलं. त्या प्रमाणे मग ट्प्या ट्प्याने विविध अधिग्रहणाचे कायदे पास करत ही सगळी जमीन ताब्यात घेतली गेली. त्यावर लगान वसूल करणे सुरु झाले. म्हणजे जमिनीचे मालक कोण? ब्रिटीश सरकार. अन शेतकरी कोण? ताबेदार/भोगवटादार.

 

स्वातंत्र्या नंतर

हे सगळं दिडेकशे वर्शे चाललं. सन १९४७ साली गोरे निघून गेले व सत्ता आपल्या हातात आली. आता नेहरु सरकार सत्तेत बसलं अन पहिला प्रश्न पडला तो म्हणजे उत्पन्नाचा. तो वसूल कुठून करायचा? शेतक-याकडून. विविध राज्ये निर्माण झालीत व राज्यांनी जमिनीतून कर वसूल करायचं ठरवलं. मग त्यांनीही तेच केलं. आता ही जमीन नव्या मालकाची म्हणजे भारत सरकार/महाराष्ट्र सरकार या मालकाची होती. शेतक-याने या नविन मालकाकडे कर भरुन जमीनिचा ताबा ठेवण्याचे आदेश निघाले. कर भरणार नसाल तर ताबा सोडा असा तो संकेत होता. म्हणजे सरकार जमीन जप्त करुन घेणार. शेतकरी हवालदिल होता. कर तर भरणे आहेच. कारण जमीन सोडून चालणार नव्हतं. पण पैसाही नव्हता. सरकार पर्यंत ही गोष्ट पोहचायला वेळ लागला नाही. मग सरकारनी स्कीम लॉंन्च केली की जमीन धारक म्हणजेच भोगवटादारांना जमिनीचा ताबा हवा असल्यास दोन प्रकारे ताबा ठेवता येईल एक म्हणजे जुनी शर्थ अन दुसरा प्रकार म्हणजे नवी शर्थ यालाच वर्ग १ आणि वर्ग २ असं म्हटलं जातं.

हा काय प्रकार आहे? तर वर्ग एक(जुनी शर्थ) म्हणजे सन १९५२ मध्ये शेतकरी जो शेतसारा भरत होता त्याच्या ६ पट शेतसारा आणि २० पट असा एकुण २६ पट शेतसारा सरकार दरबारी भरल्यास शेतक-याची (भोगवटादार) जमीन जुनी शर्थ म्हणजेच वर्ग एक मध्ये टाकण्यात येईल व तुम्हाला वर्ग एकचे भोगवटादार बनता येईल. याचा फायदा काय? तर तुमच्या ताब्यावर कोणतेच निर्बंध राहणार नाही. म्हणजेच तुम्ही ही जमीन कोणालाही सहज ट्रान्स्फर करु शकाल. म्हणजेच जमीन या प्रवर्गात असल्यास भोगवटादार सहज बदलता येतो. हस्तांतरणावर बंधने नाहीत. पण तुम्ही जर नुसतच ६ पट शेतसारा भरलात तर तुमची जमीन वर्ग दोन मध्ये टाकण्यात येईल. म्हणजेच हस्तांतरणावर निर्बंध येणार. हस्तांतरण करायचेच झाल्यास कलेक्टर व शासनाची परवानगी लागेल अशी ती भानगड होती. त्या काळात लोकांकडे पैसे कुठे असायचे. कित्येकांनी वर्ग दोनची नोंद करुन घेतली. पुढे जे होईल ते होईल, आता तरी जमीनिचा ताबा मिळतोय तेवढ काय कमी नाही या विचारांनी लोकांनी जमीनी वर्ग दोन मधुन मिळविल्या.

तर हा झाला इतिहास. थोडाक्यात काय तर सर्व जमिनी इनामी वतने होत्या. त्यांचा मालक राजे/ब्रिटीश/सरकार होते व आहेत. जमिनीचा धारक हा भोगवटादार म्हणजेच ताबेदार असतो. सातबा-यावर त्याचं नाव मालक म्हणून नसतो तर भोगवटादार म्हणजेच ताबेदार असं असतं.

याच्यात आजून एक म्हणजे तिसरी बाजू पण आहे. खेड्यापाड्यात ज्याच्या इनामी जमिनी होत्या ते शहरात राहू लागले. कोणीतरी माणूस तिकडे गावात शेतीत राबत होता. काही ठिकाणी तर मालकाचा पत्ताच नव्हता. कागदावर एकाचं नाव पण राबतोय भलताच. शेतसारा पण हा राबणाराच भरतोय. स्वातंत्र्या नंतर जमिनीच्य़ा नीट नोंदी करणे सुरु होते तेंव्हा हे अधिकारी थेट बांधावर जायचे. ताबेदार कोण म्हणून विचारल्यावर तो जो राबत असे पुढे येऊन म्हणायचा “मी सरकार!” मग याचंच नावं लिहुन घेतलं जायचं. मूळ भोगवटादार गेला उडत अन हेच लोकं भोगवटादार बनले. कारण जमीन धारणेचा मुलभूत सिध्दांतच हा आहे की जमिनीची मालकी नागरिकांकडे नाही तर ती सरकारची आहे. नागरिक हे फक्त भोगवटादार असतात, म्हणजेच ताबेदार असतात. त्यामुळे त्या काळात कागदावरचे भोगवटादार उडविले गेले व खरोखर ज्याच्याकडे ताबा आहे त्यांना भोगवटादार बनविले गेले.

मग ताबेदार/भोगवटादार म्हणून नाव चढायला आज काय अट आहे? काहिनाही, सलग १२ वर्षे जर तुमचा ताबा असेल तर तुम्ही भोगवटादार…. बोलिभाषेत, मालक!

 

Thursday 19 November 2020

बिल्डर विरोधातील ब्रह्मास्त्र-एन.सी.एल.टी.

बिल्डरनी फ्लॅट देण्यास विलंब केल्यास आधीच्या तुलनेत आज ब-यापैकी रिमेडिज उपलब्ध आहेत. तुम्हाला कंज्यूमर कोर्टातून रिलिफ मिळविता येतो. किंवा रेरा मध्येही दाद मागता येते. या दोन्ही फोरमवर तसा वेगाने निकाल दिला जातो. परंतू या दोन्हीपेक्षा आजून एक फोरम आहे जो बिल्डरला घाम फोडतो. एवढच नाही तर बिल्डरला कायमचा या व्यवसायातून उठवून टाकतो तो फोरम म्हणजे National Company Law Tribunal (NCLT). फक्त अट एवढीच आहे की इकडे तक्रार करायला दोन अटी पुर्ण कराव्या लागतात. १) तुमचं जे काही फिनान्शिअल डिस्पुट आहे त्याची रक्कम ही १ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक असावी लागते. २) एकुण फ्लॅट धारकांपैकी १० किंवा १०% (whichever is less) एवढ्या लोंकानी एकत्र येऊन तक्रार द्यायची असते. या दोन अटी जर पुर्ण होत असतील तर तुम्ही फोरमकडे तक्रार करणे तर दूर नुसत सेक्शन ८ आय.बी. कोड च्या अंतर्गत डिमांड नोटीस जरी पाठविली तर बिल्डर धावत येऊन तुमचे पाय धरेल. कारण या सेक्शन अंतर्गत डिमांड नोटीस गेली की पुढची कारवाई ही थेट बिल्डरवर IRP/ RP(Interim Resolution Professional/ Resolutions Professional) बसतो. म्हणजे काय? थोडक्यात प्रशासक नेमला जातो. म्हणजे बिल्डरकडून सगळं मॅनेजमेंट काढून घेतलं जातं व हा अधिकारी बिल्डरच्या ऑफिसचा ताबा घेतो. इथून पुढे बिल्डरला स्वत:च्याच ऑफिसात कोणताच निर्णय घेता येत नाही. हा मामला समजण्यापुर्वी काही बेसीक प्रश्न बघू यात.

प्रश्न: बिल्डर विरोधात या फोरमकडे कोण दावा टाकू शकतो?

उत्तर: असा कोणताही क्रिडिटर्स ज्यांनी बिल्डरला पैसे दिलेत तो बिल्डरच्या विरोधात दावा टाकू शकतो.

प्रश्न: मग फ्लॅट बायर हा क्रेडिटर्स मानला जातो का?

उत्तर: हो, नव्या अमेंडमेंट नुसार फ्लॅट बायर हा ऑपरेशनल क्रेडीटर्स मानला जातो.

प्रश्न: आजून कोणते क्रेडिटर्स असतात?

उत्तर: दोन प्रकारचे क्रेडिटर्स असतात. एक म्हणजे फिनान्शिअल क्रेडिटर्स जे कंपनीला फंडिग करतात व त्या बदल्यात व्याज घेतात. दुसरे म्हणजे ऑपरेशनल क्रेडिटर्स जे वस्तू किंव सेवा पुरवतात व त्या बदल्यात कंपनीनी यांना पैसे देणे असते. फ्लॅट बायर हा दुस-या प्रवर्तातील क्रेडिटर मानला जातो. कारण बिल्डर जेंव्हा वार्षीक Accounting and Balance Sheet तयार करतो त्यात फ्लट धारक हा Income Tax Act च्या तरतुदी नुसार क्रेडिटर्स मध्ये दाखविला जातो.

प्रश्न: कोणत्या कायद्या खाली दावा दाखल केला जातो?

उत्तर: Insolvency and Bankruptcy Code  च्या अंतर्गत कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे दावा दाखल केला जातो.

एकदा या आर.पी. नी बिल्डरच्या ऑफिसचा ताबा घेतला की तो लगेच पेपरात जाहिरात देतो व आवाहन करतो की या अमूक बिल्डर विरोधात कायदेशीर कारवाई सुरु करत असून ज्यांचे कोणाचे देणी-घेणी असतील त्यांनी अमूक दिवसाच्या आता आपले प्रस्ताव पुराव्या सकट आमच्याकडॆ सादर करावे. मग तमाम देणी-घेणी असलेली लोकं धावून येतात. या सगळ्याचा डेटा एकत्रीत केला जातो. एकदा हा डेटा जमा झाला की एकूण देणी किती व घेणी किती याचा हिशेब लावला जातो.

क्रेडीटर्स कमिटी:

हे काम करताना या बिल्डर्सच्या एकूण क्रिडिटर्सची कमिटी बनविली जाते. या कमिटीच्या देखरेखीत किंवा त्यांना विश्वासात घेऊनच आर.पी. हा काम करत असतो. कारण आर.पी. हा क्रेडिटर्सच्या हितासाठी नेमलेला असतो. त्यांनी बिल्डरच्या हातून सगळं मॅनेजमेंट घेण्याचं मुख्य कारणच ते असतं. एकदा ही प्रोसेस झाली की मग मार्केट मधील एखादी मोठे कंपनी या कंपनीस टेक ओव्हर करायची ऑफर घेऊन येते. तेंव्हा एकुन क्रेडिटर्सच्या ६६.६७% क्रेडिटर्सच्या बहुमताने ठराव संमत करुन नविन कंपनीकडे कारभार सुपुर्द केला जातो. परंतू बहुमताचा वरील आकडा जमत नसल्यास मग कंपनीची दिवाळखोरी सुरु होते. नियमा प्रमाणे दिवाळखोरीचा अधिकारी नेमला जातो किंवा आर.पी.लाच तसा अधिकारी म्हणून नेमलं जातं व कंपनीची सगळी मालमत्ता विकुन देणे घेणी उरकली जातात

किती काळ

सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे किती दिवसात होईल? आता खूप सोपं झालय. तुम्ही तक्रार दिलीत की एक ते दिड महिन्याच्या आत आर.पी. नेमला जातो व त्यांनी ३३० दिवसात सगळा हिशेब उरकायचा असतं. यालाच रिझोलुशनची प्रक्रीया संपने म्हणतात. एकदा हे झाल्यावर कोणी ही कंपनी घ्यायला/टेकओव्हर करायला तयार आहे का याची जाहिरात द्यायची असते. तसं झालं तर ठीक नाही तर लगेच लिक्विडेटर नेमल्या जातो व लिक्विडेशन म्हणजेच दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु होते. यात असेट्ची यादी तयार केली जाते तसेच देयकांचीही यादी तयार केली जाते. त्या नुसार देणे घेणी फेडली जातात व  कंपनी कायमची बंद होते.  

थोडक्यात तुम्ही जर एखाद्या बिल्डरकडून फ्लॅट विकत घेतलात व तो जर वेळेवर देत नसेल किंवा आजून काही बहाणे सांगून काम रखडवत असेल तर त्याला आ.बी. कोडच्या सेक्श्न ८ च्या अंतर्गत डिमांड नोटीस पाठवून पैसे परत मागायचे. १० दिवसात जर त्यांनी पैसे दिले नाही तर ११ व्या दिवशी वरील तक्रार दाखल करता येते. त्या नंतर ३३० दिवसाच्या आता वादाचा सोक्षमोक्ष लागलेला असतो. बिल्डरचा वकील जर जानकार असेल तर या नोटिशीतून पुढे काय वाढून ठेवलय हे बिल्डरला नीट समजावून सांगेल. त्या नंतर बिल्डर लगेच तुमच्याकडे हातपाय जोडत धावून येईल. बरेचवेळा वकिलांनाही असल्या तरतुदी माहित नसतात. मग अशा वेळी बिल्डर आधी नखरे जरुर करतो पण ३३० दिवसाच्या आता बिल्डर रस्त्यावर येतो.