Sunday, 13 April 2025

प्लॉट खरेदीची प्रश्नावली

 

प्लॉट खरेदीची प्रश्नावली

जेंव्हा तुम्ही बिल्डर सोबत प्लॉट घेण्यासाठी बैठक करता तेंव्हा खालील प्रश्न नक्की विचारा. म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही.

 

प्रश्न: बिल्डर यांचे नावे सदर मिळकतीचा ७/१२ आहे का?

उत्तर हो असल्यास प्रश्न संपला. पण नाही असल्यास मग दुसरा प्रश्न येतो. तो म्हणजे जर ७/१२ बिल्डरच्या नावे नसेल तर कोणत्या अधिकारात हा बिल्डर सदर मिळकत विकत आहे? आणि मूळ जमीन मालक उद्या हरकत घेतल्यास आपले पैसे पण गेले आणि जमीन पण गेली. त्यामुळे जर बिल्डर किंवा डेव्हलपर याचे नावे ७/१२ नसल्यास बिल्डरच्या नावे चेक देऊ नये. मुळ मालकाच्या नावे चेक देणे. करारावर सह्या पण मुळ मालकाचे असावेत.

 

प्रश्न : मुळ मालकाशी विकसन करार झाला का?

उत्तर जर हो असेल तर त्याची कॉपी मागून घेणे. दोघात काय करार आहे तो वाचणे. मगच व्यवहार करणे. अन्यथा इथेही फसवणूक होत असते.

 

प्रश्न: बिल्डर आणि जमीन मालक हे पार्टनर किंवा जॉंईंट व्हेन्चर प्रोजेक्ट करत आहेत का?

उत्तर जर हो असेल तर त्याची कॉपी मागून वकिलास दाखविणे. त्यातील अटी शर्थी समजून घेणे. नंतरच व्यवहार करणे.

 

प्रश्न: बिल्डरने प्रोजेक्टवर लोन घेतले आहे का?

उत्तर नाही असल्यास विषय संपला. पण हो असल्यास त्याची कॉपी मागविणे. तसेच तुम्ही व्यवहार करत असल्यास त्या संबंधीत बॅंकेची तुमच्या प्लॉट पुरती एन.ओ.सी. घेणे. उद्या बिल्डरनी लोन चुकते न केल्यास बॅंक जप्ती आणणार. मग तुमच्याकडे एन.ओ.सी. असल्यास तुमचे नुकसान होणार नाही.

 

प्रश्न: बिल्डरने ले-आऊट मंजूर केला का?

उत्तर हो असल्या त्याचा मंजूर ले-आऊट तपासणे. नाही असल्यास अशा ठिकानी प्लॉट घेणे म्हणजे निव्वड रिस्क आहे. बेकायदेशीर बांधकाम करुन पैसे घालवायचे असल्यास घ्या. अन्यथा अशा ठिकाणी प्लॉट घेऊ नये.

 

प्रश्न: बिल्डरनी सर्च रिपोर्ट काढलाय का?

उत्तर हो असल्यास कॉपी मागवून वकिला तर्फे तपासून घेणे. अन्यथा स्वत: वकिल लावुन स्वतंत्र सर्च रिपोर्ट करुन घेणे.

 

प्रश्न: बिल्डरनी जमीन विकत घेतल्यास मुळ मालकास पैसे चुकते केले का?

उत्तर हो असल्यास संबंधीत कागदपत्र तपासणे. कारण बरेच वेळा बिल्डर शेतक-याला अर्धे पैसे देतात. बाकीचे नंतर देतो म्हणून थकबाकी ठेवतात. ते पैसे न देता पळून जातात. मग शेतकरी प्लॉट धारकांच्या विरुध्द केस दाखल करुन मनाई हुकूम घेतो. यामुळे बराच मनस्ताप होतो. थोडक्यात तुम्ही जर प्लॉट विकत घेणार असाल तर वरील प्रक्रीया नीट समजून घ्या. जमिनीचे कागदपत्र तपासून घ्या. नंतरच काय तो व्यवहार करा.

No comments:

Post a Comment