Wednesday, 28 May 2025

पुस्तक परिचय- बिट्स एन्ड बाईट्स

 बिट्स एन्ड बाईट्स


पुस्तक हाती आले तेंव्हा माझ्या सवयी प्रमाणे आधी मागचे पान वाचून काढले.  लेखिका कोण, काय लिहले वगैरे जुजबी परिचय दिसला. इतर कोणत्याही पुस्तकात असते ते इथेही होते. त्यानंतर पुस्तकातील अर्पण पत्रीका, सुरेश द्वादशिवार यांची प्रस्तावना वगैरे संपवून पुस्तकाच्या मुख्य गाभ्यात आलो. 

हे पुस्तक ४ भागात विभागलेले आहे. त्यातील पहिला भाग आधी-व्याधी, दुसरा भाग कथा-व्यथा, तिसरा भाग वैषम्य लहरी आणि चौथा भाग नाद अनाहद. पुस्तकाचे नाव वाचून काहीच अंदाज येत नाही. अगदी वाचायला सुरुवात केल्यावरही काहीच अंदाज येत नाही. आधी वाटले की हे पुस्तक म्हणजे लघू कथांचे पुस्तक असावे. पण पुढे पुढे सरकत गेल्यावर लक्षात आले की पुस्तकातील लिखाणाचा एकुन बाज हा बातमी कथनाचा आहे. पण आजून पुढे काही लेख वाचल्यावर वाटू लागले की याला थोडी फिलॉसोफीकल किनार असून समाज कल्लोळावर केलेले चिंतन व मंथन आहे. आणि जेंव्हा पुस्तक वाचून संपले तेंव्हा असे वाटू लागले की जगभरातील तात्कालीन संदर्भाना धरुन मांडलेला  हा स्त्री जिवनाचा लेखाजोखा आहे. पण काही वेळ जरा विचार केल्यावर या स्त्री जिवनाच्या लेख्या जोख्या पलिकडॆ आजून काहीतरी आहे असे सारखे वाटू लागले. मी थोडा अधिक विचार केला व नंतर कळले की हे पुस्तत म्हणजे स्त्री जिवनावरील चिंतन मंथनातुन आलेला लेखाजोखा  तर आहेच. पण त्याच बरोबर अजुन एक गोष्ट आहे ती म्हणजे लेखिकेचं लिखान संवेदनाच्या पलिकडॆ जाऊन सहवेदनाच्या टप्यावर गेलय,  हे जाणवल.


काही ठळक घटना

प्रकरण पहिले सुरु होते भयभिताच्या तांड्या पासून... ही सिरीयाची कथा आहे. अनेक प्रकारचे सामाजीक मतभेद, वैचारीक घुसळन, पराकोटीचा विध्वंस आणि अत्याचार यातून जाणारा हा देश. हा देश अनेक पिढ्याच्या हिंसेत  पिसून निघाला तरी धडा न घेणारा सिरीयन समाज, याची ही गाथा आहे. या हिंसाचाराचा सगळ्यात मोठा बळी कोण? हे सांगायची गरज नाहीच. कोणताही समाज लढतो तेंव्हा पहिला बळी स्त्रीचा जातो. इथेही तेच दिसते, पण या पुस्तकात एक नविन बाजू उलगडून मांडली गेली ती म्हणजे स्त्रीयांनी हाती बंदूक घेऊन एक संघर्ष उभा केला, त्याचे कथन आहे. म्हणून हे पुस्तक वेगळे ठरते. खरंतर प्रत्येक लेख एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. असे प्रचंड व अवाढव्य आवाका असलेले विषय छोट्या छोट्या लेखात बांधून तुमच्या पुढे ठेवण्यात आले. त्यामुळे बिट्स अन्ड बाईट्स हे नाव समर्पक ठरते. 


बॅडवॅगन इफेक्ट नावाचा लेख/प्रकरण येतो. त्यात एक मानसशास्त्राचा जो प्रयोग करण्यात आला, तो पुराव्यानीशी  कथन केलाय. घटना अशी आहे की, एका स्त्रीने आपले शरीर लोकांच्या पुढे ठेवले व मनात येईल ते करा अशी सूट दिली. लोकांनी मोकळीक मिळाल्यावर जी विकृती दाखविली ती माणूस म्हणून लाज वाटावी अशी आहे. प्रत्येक माणसात पशू असतो पण  संस्कार व कायदा यांने तो बांधलेला असतो. हे बंधन सैल झाले की तो खरे रुप दाखवतो. त्याची प्रचिती या घट्नेने परत एकदा दिली.  स्वाती मर्डर केस नावाचा पुढील लेख तर भ्याड व बडेजाव करणारा मेनबत्तीछाप समाजाचा बुरखा टराटरा फाड्तो. जेंव्हा धीटाईने पुढे यायची गरज असते तेंव्हा आपला समाज शेपूट घालतो व अत्यंत सुरक्षीत वातावरण लाभले की मेणबेत्ती धरुन लढाईचा आव आणतो. ही लबाडी, आणि दुटप्पीपणा याचा ठाव घेणारा हा लेख वाचून माणूस स्तब्ध होतो. 


यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी माता, त्यांचे शोषण व शासनाची उदासीनता, मुस्लीम महिलांचा पुरोगामी लढा, आत्महत्यांचे उदात्तीकरण पासून तर हाक बलुचिस्तानची ते मामाचं पत्र हरवलं पर्यंतचे विविध समाज अंगाला स्पर्शून जाणा-या लेखांची मालिका एकत्र बांधून आपल्या पुढ्य़ात ठेवली आणि त्याला नाव दिले बिट्स एन्ड बाईट्स. हे पुस्तक चार भागात असून ते पुढील प्रमाणे विविध लोकांशी भेट घालून देते.


वरील महत्वाच्या व ठळक घटना सोडून पुस्तकभर काय आहे? तर त्याचा सार खालील प्रमाणे आहे.

आधी-व्याधी

सिरिया मध्ये बंदुका हाती घेऊन धडधड धडधड धावणा-या बायका या पुस्तकात भेटतात. अरे पण आम्ही तर ऐकलय की सिरियात ते आयसीस वाले बंदुका घेऊन धावतात? हो ते खरच आहे. पण ही दुसरी बाजू पण आहे. ती या पुस्तका सापडते. बॅडवॅगन एफेक्टचा प्रयोग करायला बसलेली बाई आपलं शरीर मुक्तपणे खेळायला बाजारातील चौकात ठेवून दिल्यावर तिच्या शरीराशी खेळणारी सिव्हिलाईज्ड विकृती सुद्धा इथे सापडते. जाती धर्माचा उन्माद व तांडव इथे सापडतो. स्वातीचा मर्डर होताना लपून बसलेला मेणबत्तीछाप समाज, नंतर मोर्चे काढून बडेजाव करताना इथे दिसतो. गरीब व अशिक्षीत पोरींना चुटुर पुटूर पैसे देऊन गर्भवती करणारा व कुमारी मांता म्हणून त्यांना सोडून जाणार पुरुष तर इथे सापडतोच पण त्याच बरोबर उदासीन वृत्तीचा शासकीय बाबू हा सुध्दा इथे दिसतो. याच बरोबर चक्क एक पुरोगामी  मुसलमान महिलांची संघटना इथे भेटते, ज्या बद्दल आपण फारसे कुठेच ऐकलेले नाही अशी संघट्ना प्रत्यक्ष ग्राऊंडवर काम करत असूनही ज्याची आपल्याला भनक नाही ती अचानक इथे सापडते.  हे पुस्तक वाचताना फार फार दुरून एक हाक येते... मदत मागणारी ती हाक... दूर  बलुचिस्तान मधून येते. आपन ऐकत नाही ती गोष्ट वेगळी पण ती येते. अशी ऐकुन न ऐकलेली ती बलुच लोकांची हाक या पुस्तकात सापडते. माणूसकीचा बोन्साय पण भेट्तो... हा काय आहे. मी नाही सांगू शकत काय आहे. तुम्हीच जाऊन वाचा. माझी हिंमतच गडुन पडते हे सांगताना. गगन ठेंगणे करणा-या बायकांची यशोगाथा पण इथे सापडते. साकोलीतील जमीनिचे ७/१२ उतारे ज्यावर घरातील प्रत्येक बाईचे नाव लावले जाते असे एक अवलीया लोकांच गाव पण इथे सापडतं. थोडक्यात या सदरात काही गोष्टी सापडतात तर काही व्यक्ती भेटतात. हे सदर भेटण्याचा व सापड्ण्याचा सदर आहे.


कथा-व्यथा

कथा व्यथा नावाचा दुसरा भाग आहे. त्यात केटीचा रेप व त्यानंतरचा प्रदीर्घ लढा आतून कुरतडून टाकतो. आयसीसच्या लांडग्यांच्या हाती सापडलेली व सेक्स स्लेव म्हणून त्या दहतवाद्यांची वासना शमवत एक झुंझार प्रवास करणारी तरुणी जी थेट लंडन पर्य़ंत जाते व पुढे उभ्या जगाला आपली व्यथा सांगते. ती शूर नादीया इथे सापडते. हरवलेली शरबत गुल नावाची अफगाण सुंदरी जीचे हरवणे सापडणे चालू असते ती इथे सापडते खरी... पण का बाई सापडलीस? असं म्हणावं इतकी तिची दुरावस्था झालेली आहे. ऍसिड अटॅक मध्ये चेहरा विद्रूप झालेली सोनाली मुखर्जी व तिच्यावर जिवापाड प्रेम करणार कलंदर प्रेमी इथे सापडतो. बाह्य सौंदर्याच्या परिभाषेला छेद देत जन्माला आलेली ही प्रेम कथा व सुखाचा संसार लपवून ठेवा, नजर लागेल कोणाची.. असं म्हणावं इतकी गोड कहाणी इथे सापडते.  नऊ हजार दिवसाचा लढा देणारी एक विकृत स्त्री... जी आकांडतांडव करुन लोकांचं आकर्षण ओढवून घेणे यातच धन्य मानणारी व आपल्या उचापतखोर वृत्तीला लढा म्हणून रंगविणारी सुनंदा मोकाशी इथे भेटत. फरक एवढाच की लेखिकेने तिची बाजू मांडताना या पात्राची विकृती झाकली आहे. नागपुरातील एक गुणी निवेदिका, तिच्या सासरच्या लोकांच्या लोभामुळे आयुष्याची होळी होते. अशी एक विदारक कथा इथे मिळते. नववधू म्हणून स्वप्न रंगवून ज्या घरात आली तिथे हुंडाबळी ठरते. फसव्या माणसाशी प्रेम करुन लग्नाच्या पवित्र बंधनात अडकते खरी पण पुढचा माणूस पवित्र नसला की हे पवित्र बंधन कोण्या कामाचे रहात नाही. ती व तिच्या सारख्या पवित्र बंधनात अडकलेल्या व पुढे फरफटत जाणा-या बायका इथे भेटतात. या सदराच्या शेवटी एक पागल चित्रकार भेटतो व गायबही होतो. इतकी सगळी पात्रं इथे भेटतात.


वैषम्य लहरी

हा या पुस्तकातील तिसरा भाग आहे. यात लेखिकेचा थोडासा फिलॉसॉफिकल ऍंगल अधून मधून डोकावत राहतो. नर-मादी पलिकडचा माणूस घडविण्याचा विचार इथे भेटतो. तो शक्य आहे की नाही हा स्वतंत्र विषय आहे. नर किंवा मादीच्या पलिकडे जाऊन माणूस जन्माला घालणारी स्त्री इथे सापडते. २४ तास ऑनलाईनवाला कल्लोळ येथे भेटतो. लेखिकेने त्या कल्लोळाची गच्यांडी धरुन समाचारही घेतला आहे. बेफाम व बेजाबदार पणे गाडी चालविणारे आणि त्यांच्या या बेफिकीरीतून हकनाक बळी जाणारे या बद्दल लेखीकेची राग इथे दिसतो. तसेच कोणताही दोष नसताना अपघाताचा बळी पडलेल्या लोकांबद्दल हळहळ सुध्दा इथे आहे. नव्या पिढीची भाषा, मोठं होणं म्हणजे काय? आत्मपरिक्षन व दुसरा ऍंगल सुध्दा इथे दिसतो. संस्कृती पतनाचा महोत्सव साजरा करुन स्केटींगची गरुडझेप घेणारे नागपुरी पोट्टे जे पायाला चाकं बांधून कन्याकुमारी ते नागपूर असा एकुण २००० किमी चा प्रवास करतात, हे सगळे या पुस्तकात भेटतात. या पुस्तकातून लेखिका तुम्हाला अनेक पात्रांच्या भेटी घडवत नेते. अनेक विषयावर चिंतन मनन करायला लावते. आणि ज्या गोष्टी फक्त बातमी म्हणून ऐकलात व विसरुन गेलात त्याचं गांभीर्य आणि समाजावर होणारं परिणाम याचे जाणीव नव्याने करुन देत जाते. 


नाद अनाहद

हा या पुस्तकातील शेवटचा भाग असुन यात लेखीकेने गुलजार पासून इतर सिने कलाकारांवर लेखन केले आहे. हा सदर फिल्मी लोकं व कलाकार यांच्या बद्दल असल्याने तो प्रत्यक्ष वाचून समरस होण्याचा ज्याचा त्याचा मामला आहे.  

थोडक्यात काय सांगता येईल...

तर हे पुस्तक विविध घटनांचा तात्कालीन वृत्तांत आहे. समाचार आहे. किंवा बातमी आहे असेही म्हणता येईल. हे पुस्तक वाचताना असेही वाट्त राहते की यातील जवळपास ८०% घटना आपणास माहीत आहेत. कधी बातम्यात वाचलेले, किंवा टिव्हीत पाहिलेले किंवा इतर कुठे तरी यांचा संदर्भ आपल्या ऐकण्यात आल्याचे जाणवते. पण हे पुस्तक मात्र नुसतं बातमीछाप मांडणी नाही तर त्या संवेदनशील घटनांची सहवेदनेतून आलेली मांडणी आहे. त्यामुळे हे पुस्तक कायम जवळ बाळगावे. ते संदर्भ पुसट होऊ नयेत म्हणणून केंव्हाही कुठलाही लेख काढून वाचावा अशा स्वरुपात आपल्या हाती देण्यात आले. हे पुस्तक वाचालया तुम्हाला सलगतेची अजिबात गरज नाही. कोणतेही पान काढून वाचा, कधीही वाचा, तुम्ही एकरुप होऊन वाचाल असे पुस्तक आहे.


असे पुस्तक दिल्या बद्दल लेखिका रश्मी मदनकर यांचे आभार व अभिनंदन.

Tuesday, 27 May 2025

इंद्रायणी पात्रातील ३६ बंगले

 इंद्रायणी पात्रातील ३६ बंगले

==================

पुण्यात सर्वत्र बेकायदेशीर बांधकाम झालेले आहे व अधुन मधुन यातील काही बांधकामावर हातोडा पडत असतो. त्याची मग चर्चा होते, वाद विवाद रंगतात अन लोकं विसरुन जातात. जी लोकं या चर्चा आणि वादविवाद मोठ्या रंगतदार पणे मांडतात आणि ऐकतात यातीलच काही लोकं पुढे जाऊन बेकायदेशीर बांधकाम करतात किंवा बेकायदेशीर सदनिका विकत घेतात. हे नित्याने चालू आहे. 

पण यावेळी इंद्रायणी पात्रातील जे ३६ बंगले पाडल्या गेले त्या अनुषंगाने जो हाहाकार उडालाय तो मात्र अनेकांची झोप उडविणारा आहे. त्यामुळे या लेखातून प्रमूख दोन बाजू मांडायचा प्रयत्न करतोय. पहिली म्हणजे ३६ बंगलेधारकांनी काय चूक केली ही बाजू पाहू या. आणि दुसरी बाजू म्हणजे जर तुम्ही बांधकाम करणार असाल तर काया काळजी घ्यावी हे सुध्दा पाहू या.


३६ बंगलेधारकांची चूक

==============

हे जे ३६ बंगले धारक आहेत त्यांची कथा काय आहे? तर यांनी पूर रेषा (ब्लू लाईन) च्या आत मध्ये पडणारी जमीन विकत घेतली. त्यामुळे यांचे नावे ७/१२ किंवा प्रापर्टी कार्ड यापैकी एक कागद झाले. त्याच बरोबर खरेदीखत व इंडेक्स २ यांचे नावे झाले. त्यामुळे या लोकांना सदर जमिनीवर मालकी हक्क प्राप्त झाला. मग या लोकांनी सदर जमिनीवर बंगले बांधले. मग मनपाने हे बांधकाम बेकायदेशीर असल्याची नोटीस धाडली. या नोटीसीला कोर्टात आव्हान देण्यात आले. सर्व कागदपत्र तपासून कोर्टाने सदर बांधकाम बेकायदेशी असल्याचा निकाल दिला. त्यामुळे मनपाने ही घरं किंवा बंगले जमीनदोस्त केलीत. ही आहे घटना.


कराच्या पावत्या: 

==========

जे बंगलो धारक आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की, ही जमीन आम्ही विकत घेतली, घरं बांधलीत, कर भरतोय, लाईट बील आहे, घरटॅक्स आहे, त्यामुळे आमचे बांधकाम योग्य व कायदेशीर आहे. जे पाडकाम करण्यात आले ते बेकायदेशीर असल्याचा या लोकांचा मनपावर आरोप आहे. या बद्दल कायदा काय म्हणतो. तर कराच्या पावत्या, लाईट बील, पाणी पट्टी या सर्व पावत्या सेवा घेत असल्याचा पुरावा आहे. किंवा तुम्ही मनपा कडून ज्या सेवा घेता त्याची ही पावती आहे. त्यामुळे या पावत्या म्हणजे घराचे बांधकाम कायदेशीर असल्याचा पुरावा ठरत नाही. भारतातील प्रत्येक नागरीकाला मूलभूत सोयी, जसे की पाणी, लाईट, रस्ता देणे बंधनकारक आहे. मग त्याचे बांधकाम कायदेशीर असो किंवा बेकायदेशीर असो. दोन्ही केस मध्ये त्याला मूलभूत सोयी देणे मनपाला बंधनकारक आहे. मुलभूत सोयी घेतल्या व त्याची पावती आहे म्हणजे बांधकाम कायदेशीर ठरतो असे होत नाही.


झोन दाखला:

========

जेंव्हा केंव्हा तुम्ही एखादे बांधकाम करता तेंव्हा त्या गटाचा किंवा सर्वे नंबरचा झोन दाखला तपासणे जरुरी असते. कारण झोन दाखल्यात हे लिहलेले असते की सदर गट कोणत्या झोन मध्ये मोडतो. म्हणजे रहवासी झोन, ना विकास झोन, बी.डी.पी. झोन, हिल टॉप झोन वगैरे. यातून काय कळतं? या झोन मधून हे कळतं की सदर जागेवर कोणते काम करण्यास परवानगी आहे? किंवा कोणते काम करण्यास परवानगी नाही हे निश्चीत होते. म्हणजे समजा तुम्ही एखादी जागा घेतली व त्याचा झोन बी.डी.पी. आहे. तर तिथे तुमची खरेदी कायदेशीर ठरते. म्हणजे मालकी हक्क कायदेशीर असतो. पण बांधकाम केल्यास ते मात्र बेकायदेशीर ठरते. तसेच पूर रेषेच्या आतिल जर जागा असेल तर खरेदी कायदेशीर ठरते. पण त्यावर बांधकामास प्रतिबंध असल्याने बांधकाम बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे जमीन घेताना झोन तपासावे. त्याचा योग्य अर्थ लावता येईल असा अनुभवी वकिल करावा.


७/१२ वरील नाव:

==========

तुम्ही एखाद्या जमिनीची खरेदी केल्यावर ७/१२ सदरी नाव आले की मालकी हक्क आले. याचा अर्थ तुम्ही त्या जमिनीवर काहीपण करु शकता असे होत नाही. जमिनीचा झोन पहा, आणि ज्या झोन मध्ये ती जमीन येते त्या अनुषंगाने अनुज्ञेय गोष्टीच तिथे करा. आता वरील प्रकरणात असे झाले की यांनी पूर रेषेच्या आतील जमीन घेतली. मालकी हक्का मिळाला. यांना धडाधड बंगले बांधले. इथेच चूक झाली. पूर रेषेची जमीन तुमच्या मालकीची झाली म्हणजे तुम्ही घर बांधू शकता असा अर्थ होत नाही. मग प्रश्न पडतो की मिळालेल्या मालकीचा उपयोग काय? यावर उत्तर असे आहे की झोन दाखल्यावर जी गोष्ट आहे ती गोष्ट सदर जमिनीच्या मालकांनी करावे. म्हणजे नेमकं काय करावं? ही जमीन पूर रेषेतील असल्याने मासे पालन करु शकता? वांगे मिर्ची पिकवू शकता. किंवा पाण्याशि निगडीत एखादे शेती व्यवसाय करु शकता. तुमच्या मालकी हक्काला या गोष्टी करण्यास मान्यता आहे. पण या लोकांनी मालकी हक्काचा वेगळाच अर्थ काढला व थेट बांधकाम केले. आणि कायद्याने या मालक लोकांस बांधकाम करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे ७/१२ सदरी नाव असणे म्हणजे मालकी हक्क आले असा आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की मालक लोकांनी प्रतिबंधीत कार्य सदर मिळकतीवर करु शकतील. मालकी हक्क असणे वेगळी बाब आहे. आणि तिथे कोणते काम केल्या जाऊ शकते ही वेगळी बाब आहे. दोन्हीत गल्लत केल्याने बंगले पाडल्या गेले. 


दुय्यम निबंधक व दस्त नोंदणी

====================

यात अजून एक महत्वाचा मुद्दा खुप चर्चेत आहे तो म्हणजे सर्व लोकांनी दुय्यम निबंधक यांचे कडे कायदेशीर दस्त नोंद केली. कर भरला. मग या लोकांनी दस्त नोंदणी करतानाचा बंदी घालायला हवी होती. असा एक सूर आहे. पण मी वर लिहले आहे की दुय्यम निबंधक यांचेकडे द्स्त नोंद करताय म्हणजे मालकी हक्क ह्स्तांतरीत करताय. एका मालका कडून दुस-या मालकाला जमीन देत आहात. याचा दस्त खरेदीखत नोंदविला गेला. मालकी हस्तांतरण करण्यास बंधन नाहीच मुळी. तुम्ही नदी काठची जमीन घेऊ शकता. मालक बनू शकता. त्याला कायद्याची बाधा नाही. पण मालक बनलात म्हणून बांधकाम कराल तर ते चूक आहे. तुम्ही नदी काठच्या जमिनीचे मालक बनल्यावर त्या जमिनीवर मासे पालन शेती करा की, त्याला बंदी नाही. पण तुम्ही भलतेसलते काम कराल तर त्यावर बंदी आहे. 


बिल्डर दोषी आहे का?

==============

वरील प्रकरणात आजून एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ज्या बिल्डरनी हे ३६ बंगल्यांचे प्लॉट्स पाडून विकले त्याला दोषी धरता येईल का? याचे उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे. ते कशावरुन ठरणार? तर सदर जमिनीच्या व्यवहारात जे कागदपत्र नोंदणी करण्यात आले त्यावर ठरेल की या बिल्डरला दोषी धरता येईल की नाही. 

समजा या बिल्डरनी सदर जमिनीचे जे प्लॉट्स पाडले व त्याचा ले आऊट बनवून या ३६ लोकांना विकले याचे कागदोपत्री पुरावे दाकल करण्यात आले तर बिल्डरला दोषी धरता येईल. एम.आर.टी.पी. कायद्याच्या कलम ५२ मध्ये अशी तरतूद आहे की जर एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीर प्लॉट्स पाडून विकल्यास त्याच्या विरुध्द फौजदारी कारवाई केल्या जाऊ शकते. त्याच्या विरुध्द एफ. आय.आर. दाखल होते व त्याला शिक्षा व फाईन दोन्ही केल्या जाऊ शकते. 

पण जर सदर व्यवाहारात बिल्डरनी जे द्स्त करुन दिले त्या दस्तात जो प्लॉटींगचा ले-आऊट ग्राहकांना दाखविण्यात आला होता तो ले आऊट जर नोंदणी केलेल्या दस्तात लावला नसेल तर मात्र बिल्डरवर कारवाई करता येणार नाही. कारण बिल्डर असा डिफेन्स घेऊ शकतो की मी शेत जमीन विकली व ती घेणा-यानी शेती याच कामासाठी घेतली. त्यामुळे मी जबाबदार नाही. त्यांनी घेतल्यावर शेती ऐवजी घराचे बांधकाम केले यास मी जबाबदार नाही. असा बचाव बिल्डर घेऊ शकतो. आणि ले आऊटचा कागद नोंदणी दस्तात नसल्यास बिल्डरचा बचाव ग्राह्य ठरतो. तर ही आहे कायदेशीर तरतूद आणि बिल्डरसाठीची पळवाट.


चुका काय झाल्या.

===========

१) ब्ल्यु लाईनची जमीन बांधकामाच्या उद्देशाने घेतली

२) ले आऊट नाही.

३) क प्रत नावाचा दाखला नाही. (प्लॉट वाईज)

४) झोन दाखला नीट तपासला नाही. किंवा त्याचा अर्थ लावला नाही.

५) बांधकाम परवानगी घेतली नाही.

६) ओ.सी./ बांधकाम पुर्णत्वाचा दाखला घेतला नाही. 

यातील एकही गोष्ट नाही. निवासी घरे बांधताना किंवा कोणतेही बांधकाम करताना वरील कागदपत्र, त्याची पुर्तता अत्यावश्यक असते. या सर्व गोष्टी फाट्यावर मारुन बंगले बांधले गेले. त्यामुळे ते बेकायदेशीर होते व पाडल्या जाणे अटळ होते. म्हणून ३६ बंगल्याचे मालकच बेजबाबदार पणे वागलेत. 


काय काळजी घ्यावी

============

आता महत्वाचा प्रश्न पडतो की वरील प्रकरणातून एक बाब अधोरेखीत होते ती म्हणजे बांधकाम करताना कायदेशीर मार्गाने जावे. मग त्यासाठी काय काळजी घ्यावी? सगळ्यात आधी जमीन घेताना ती रहवासी झोन मधील असावी. त्यासाठी झोन दाखला तपासावे. त्याच बरोबर सर्च रिपोर्ट काढून ३० वर्षाची हिस्ट्री तपासावी. कोणी वारस आहेत का? केस दाखल आहे का हे तपासावे. त्याच बरोबर भविष्यात आरक्षण येणार आहे का? एखादा रस्ता किंवा रुंदीकरण प्रस्तावीत आहे का? रिंग रोड वगैरे जाणार आहे का? रेल्वे लाईन वगैरे प्रस्तावित आहे का? मेट्रो वगैरे जाणार आहे का? बगीचा, प्ले ग्राउंड, दवाखाना, असे काही प्रस्ताव किंवा आरक्षण पडले का? हे तपासावे. मगच व्यवहार कराव. महत्वाचे कागदपत्र खालील प्रमाणे आहेत

१) सातबारा उतारा

२) फेरफार उतारा

३) ले आऊट

४) झोन दाखला

५) क प्रत 

६) सर्च रिपोर्ट

७) बांधकाम परगानगी (काढणे)

८) ओ.सी. (पुर्तता करणे)


वरील सर्व बाबींची नीट तपासणी करुनच प्लॉट्स घ्यावे. अन्यथा घरावर कधीही हातोडा पडू शकतो.


Sunday, 13 April 2025

विल (मृत्यूपत्र)

 

विल (मृत्यूपत्र)

विल म्हणजेच मृत्युपत्र. हा एक गुप्त दस्त असून याची खुलेआम ना चर्चा करता येत ना हा दस्त खुलेआम नोंद होत ना हा दस्त खुलेआम ठेवायाचा असतो. याचं मुख्य स्वरुप गुप्त दस्त असल्याने तो गुपचूप करायचा असतो, आणि कुठेतरी महत्वाच्य़ा ठिकाणी सुरक्षीतपणे ठेवायचा असतो. आणी याचे नावच आहे की मृत्यूपत्र म्हणजेच यातील जो कोणी लाभार्थी आहे किंवा ज्याच्या नावे मृत्यूपत्राने एखादी मिळकत दिलेली असेल तो लाभार्थी विल करणारा मयत झाल्यावरच संबंधीत मिळकतीवर हक्क सांगू शकतो. विल करणारा जिवंत असे पर्यंत लाभार्थी हक्क अधिकार सांगू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे, उद्या जर विल करणा-याला वाटले की विल रद्द करावे तर ते कितीही वेळा रद्द होते. आणि असे अनेक विल झाले असतील तर सगळ्यात शेवटची विल ग्राह्य धरली जाते. तर हे आहेत  विलचे बेसिक नियम.

विल कोण करु शकतो: ज्याची स्वकष्टार्जित मिळकत आहे तो माणूस आपल्या मिळकतीचे विल करुन कोणालाही देऊ शकतो. आणि जर वडिलोपर्जीत मिळत असेल तर मात्र त्यातील त्याचा जो काही हिस्सा आहे तेवढ्या क्षेत्रा पुरते विल केल्या जाऊ शकते. पण त्यात परत चतु:सींमा इतर गोष्टी वरुन उरलेल्या सह-हिस्सेदार यांचे सोबत वाद होणारच. त्यामुळे शक्यतो अशा मिळकतीचे विल लाभार्थ्याला डोक्याला ताप देणारेच बनते.

 

विलचे नियम काय? तुम्हाला जर विल करायची असल्यास त्याचे काही नियम माहित असणे जरुरी आहे. पहिला नियम हा आहे की एखाद्य विल मध्ये तुम्ही मिळकत ज्याला देत आहात तो म्हणजेच लाभार्थी याला विल बद्दल माहिती नसावी. किंवा विल करताना त्याचा कोणत्याही प्रकार विल करण्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नसावा. तो असल्यास विल ही रद्द होते. दुसरा नियम हा आहे की विल करणारा जो आहे त्याचे मेडिकल फिटनेसचे प्रमाणपत्र असावे लागते. अन्यथा विल रद्द ठरते. तिसरी बाब म्हणजे सही करणे. हा अत्यंत मह्तवाचा मुद्दा आहे. विल करणारा जेंव्हा विल वर सही करतो तेंव्हा उर्वरीत दोन साक्षीदार तिथे समक्ष उभे पाहिजेत. त्याच बरोबर जेंव्हा साक्षीदार सही करतील तेंव्हा विल करणार पण समक्ष असावा लागतो. अनुपस्थीतीत केलेली सही बेकायदेशीर मानली जाते विल रद्द होते.

 

कोर्टात आव्हान केल्यास:  जर विल केल्या गेली एका पेक्षा जास्त वारस असताना एकास वारसाला विल द्वारे लाभ दिला गेल्यास इतर वारस विल ला कोर्टात आव्हान देऊ शकताव खालील ग्राऊंड्सवर विल रद्द करु शकतात.

) विल बरीच वर्षे लपवून ठेवली असल्यास. म्हणजे लाभार्थी यांने अनेक वर्षे विल दडवून ठेवल्यास अशी विल रद्द होते.

) जर विलचा लाभार्थी यांचे विल करताना सहभाग होते हे सिध्द झाल्यास विल रद्द ठरते.

) विल मध्ये संपत्तीचे वाट्प करताना वारसांमध्ये अन्यायकारक वाट्प झाले हे सिध्द झाल्यास रद्द ठरते.

) नैसर्गिक वारसांना विना कारण डावलुन विल केल्यास रद्द ठरते.

) मेडिकल प्रमाण पत्र जोडल्यास विल रद्द ठरते.

) साक्षीदार यांनी एकमेका समक्ष सही केल्यास रद्द ठरते.

 

तर हे विल रद्द ठरण्याचे प्रमुख कारण आहेत. यात एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बरीच लोकं अस समजतात की विल ही नोंदणीकृत असलीच पाहिजे. ती नोंदणीकृत नसल्यास बेकायदेशीर मानली जाते रद्द ठरते. पण ही बाब खरी नाही. विल नोंदणीकृत असणे अजिबात गरजेचे नाही. अनोंदणीकृत विल सुध्दा तेवढीच कायदेशीर मानली जाते लाभार्थ्यास लाभ मिळतो.