महाराच्या मांडिवर मुलगा देणे.
==========================
मी मावळात वकिल म्हणून काम करतो. त्यामुळे
इथल्या अगदी ग्रामणी व खोलवर किंवा मुख्य प्रवाहा पासून दूर असलेला व वास्तव्यास
शहरा पासून खूप आत असलेल्या खेड्या पाड्यातील गरीब ब शेतकरी कुटुंबाशी थेट संबंध
येतो. हा संबंध केसच्या संदर्भाने येत असल्याने लोक आपली बाजू खरी खरी सांगुन
मोकळे होतात. त्यातही मी जमिनीचा वकिल असल्याने जे लोक जमिनीचे वाद घेऊन येतात ते
वाद खूप जुने असतात. थेट १९३० साला
पासूनचे ७/१२ उतारे घेऊन लोक माझ्याकडे येतात. याच बरोबर त्याकाळात ज्यांचे
७/१२ उतारे नव्हते ती लोकं कढई पत्रक
वगैरे कधी न ऐकलेले दाखल/उतारे घेऊन येतात. त्यामुळे मावळातील वकिली म्हणजे
कायद्याची जाण तर असाविच लागते. पण पक्षकाराच्या बाजुनी तो आपल्याला इथल्या जुन्या
प्रथा व चालिरीती याची नव्याने तोंड ओळख करुन देत असतो. अशीच एक नव्याने तोंड ओळख
झालेली मावळातील प्रथा म्हणजे महराच्या मांडिवर मुलगा देणे.
तर किस्सा असा आहे की, एक पक्षकार आला. जातीने
पुर्वाश्रमीचा महार. त्यामुळे मी सुरुवात करताना महार वतनाची जमीन व त्या
अनुषंगाने वाद असवा हे समिकरण डोक्यात घेऊनच कथन ऐकत होतो. पहिले १५ मिनटं त्यांनी
जो काही वाद सांगितला तो सेम टु सेम अनेक केसेस मध्ये असतो अगदी तसाच घिसापिटा, दोन पक्षकारातील वाद
होता. त्यामुळे माझ्या डोक्यात केस कशी मांडावी याचे ठोकताळे सुरु झाले. कथा पुढे
सरकत होती. १५ मिनटाचे ३० झाले, पुढे ४५ झाले. तरी या कथेच महार वतन हा शब्द काही येईना.
म्हटल्ं यार.... हा आजून वतनावर का बोलत नाही. अखेर मी त्याला थांबवून त्याची फाईल
हातात घेतली व फेरफार चेक केले. मला रिग्रांटचा फेरफार दिसलाच नाही. मी म्हटलं
तुम्ही रिग्रांट केलच नाही का? कारण वतनाची जमीन ही मुळात वर्ग २ ची असते. रिग्रांट करुन
घ्यावा लागतो. तो म्हटला नाही सर... मी रिग्रांट कशाला करु?
म्हटलं रिग्रांट केल्याशिवाय तुमचे नाव भोगवटादार म्हणून
येणार नाही. तो म्हटला सर गरजच नाही. आता मात्र मी भडकलो... अरे वतनाची जमीन
रिग्रांट न करता तुझ्या नावे कशी होईल? हे एवढं सगळं रामायण घडल्यावर आता कुठे हळुच म्हणतो
"सर.. ती जमीन वतनाची नाहीच मुळी" आणि आता मात्र माझे कान टवकारले.
मी डोक्यात जो साचा तयार केला होता. त्यात केस
फिट बसवून रटा रटाया उत्तर देऊन केस गुंडाळणार होतो. पण तो साचा ताडकन तुटुन
बिखरला. कारण ही केस वतनाची नव्हतीच मुळी. म्हटलं "जमीन वतनाची नही?" नाही सर, ती जमीन वतनाची नाही.
म्हटलं "मग कशाची आहे?"
आणि तो सांगु
लागला. आणि मी आवरुन सावरुन बसलो. कारण आज एका महाराची जमिनीची केस आली पण ती महार
वतनाची नव्हती. मावळातील एक वेगळ्याच सामाजिक प्रथेची ती कथा होती. त्यातून जी
गुंतागुंत निर्माण झाली त्याचा परिपाक हा व्यथेत झाला. आणि व्यथीत होऊन तो सांगू
लागला.
सर, आम्ही त्या अमूक गावचे वंशपरंपरेने म्हारकी करणारे महार
आहोत. माझ्या अनेक पिढ्या तिथेच त्याच गावी महारकी करत जगत होते. तर आमच्या गावात
आणि आसपासच्या गावत जे मराठे व इतर उच्च जातीय लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही महारकई
करुन जगत आलो ही एक बाजू. पण दुसरी बाजू अशी की भूत पिशाच्च, किंवा कोणत्या पाप वगैरे
प्रकारातून मुकीत मिळविण्याचा मार्ग म्हणून सुध्दा महारांचा वापर केला जायचा.
अशातिलच एक प्रथा म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला मुलं बाळं होतात पण ती जर जगत
नसतील तर त्याला मागच्या जन्मीचे पाप
समजले जाते. किंवा तुमच्या कुळाला एखादा शाप आहे असे समजले जाते. मग यातून बाहेर
पडण्याचा मार्ग म्हणजे हे झालेले मुलं महाराला दान देऊन टाकायचे. एकदा मुल महाराला
दान दिले की ते मुल महाराचे होते. मग मराठ्याचे मुल महाराचे झाले की त्याचा गोत्र
व कुळ बदलतो. त्यामुळे मग मराठ्याच्या कुटुंबावर आणि त्याच्या वारसावर जो दैवी कोप
होणार होता तो नवजात शिशुवर होत नाही. कारण महाराला दान देल्याने ते मुल आता महार
मुल असे. आणि अशा पध्दतिने ते मूल बचावतं.
या प्रथेला महाराच्या मांडिवर मुलगा देणे असे म्हणतात.
आज वकिली गुंडाळून मी मस्तपैकी एक कधी न ऐकलेली
प्रथा अनुभवत होतो. त्याला अपेक्षीत उत्तर व कायदेशीर सल्ला वगैरे गेला उडत. मी
भान हरवून कथा ऐकत होतो आणि तो पुढे बसून ऐकवित होता. माझा एकुण अवतार "अजून
सांग, आजून सांग"
असा होता. तो मधेच थांबून "सर मग आता काय करु" म्हटल्यावर भानावर येत
म्हटलं "अरे च्या आता मला बोलायचं आहे व्हय" म्हटलं थांब दोन मिनिट. ही
नविन प्रथा पचायला काही वेळ द्यावा लागला.
तर त्याची कथा अशी होती, की याच्या आईच्या मांडिवर
मराठा मुलगा बसविला होता. कारण काय तर गावातील मराठा कुटुंबाला म्हणे कुठला एक शाप
होता. त्यामुळे मुलं जन्माला आली तरी जगत नव्हती. मग मावळातील प्रथे प्रमाणे
महाराच्या मांडिवर मूल देणे हा एकमेव मार्ग होता. मग यांच्या मांडिवर मुलगा देण्यात
आला व तो मुलगा जगला. त्या खुषीत महाराचा हक्क म्हणून गावातील त्या मराठा
कुटुंबाने यांना २० गुंठे जमीन दान दिली. पण त्या काळात कागद लिहून देणे कोणाच्या
गावातच नव्हते. किंवा शब्दाला तेवढे मह्त्व असायचे की कागदाची गरज पडत नव्हती. ताब्याने
जमीन यांच्याकडे आली, पण त्याचा ७/१२
मात्र मराठ्याकडेच. हा मांडिवर आलेला मुलगा कुळाचा शाप लागू नये म्हणून मांडिवर
घेतलेल्या महार आईच्या अंगा खांद्यावर खेळत मोठा झाला. त्यामुळे लगाव तर होताच पण
दैवी कोप होईल याची भिती पण होतीच. या सर्व प्रकारात ५०-५५ वर्षे उलटून गेली. आता
मांडिवर आलेला मुलगा आजोबा झालाय. त्याचे मुलं आणि नातवंड खुषाल खेळत आहेत. दैवी
कोप वगैरे जुन्या काळातील प्रकार चैन-ब्रेक उप मुळे संपुष्टात आलाय. पुढच्या
पिढ्याना दैत्य काही गाठू शकत नाही. एकुण काय तर त्या मराठा कुटुंबाचा फॅमिली ट्री
चारो दिशा फैलत गेला. हे सगळं झाली तरी मांडिवर आलेला मुलगा जो आज आजोबा आहे तो
मात्र थबकुनच असतो. पण ही गोष्ट पुढच्या पिढीतील सदस्यांची नाही. आपला बाप
महाराच्या मांडिवर दिल्यामुळे वाचला याची जाण व भान कुटुंबातील सर्वाना असली तरी
या नव्या पिढीचा त्यावर संपुर्ण विश्वासही नाही. पण मांडिवाल्या मुलाच्या
शब्दाबाहेर नसल्याने यातील कोणीच माझ्या पक्षकाराशी पंगा घेत नाहीत. ती जमीनही परत
मागत नाहीत. पण ७/१२ मात्र माझ्या पक्षकाराच्या नावे करुन देत नाहीत.
आता माझ्या पक्षकाराचे दुखणे हे की, जमीन तर आपल्या ताब्यात
आहे, पण कागद मात्र
मराठ्याचे नावे आहे. ७/१२ नावे करुन दे म्हटलं की दुसरी पिढी हळुच अटकाव घालते.
दैवी कोपाच्या भितीपोटी चार चौघात, समाजात व इतरही ठिकाणी खुले पणाणे जमीन महाराला दिल्याचे
कबुली जरुर देतात. ती जमीन तुच कसून खा असेही म्हणतात. पण ७/१२ मात्र याच्या नावे करुन देत नाहीत.
बदलत्या काळात तेही मावळातील जमीन असल्याने कुठेतरी मनाच्या कोप-यत लोभ हळुच उसळी
मारतो व ७/१२ करुन देण्यास रोखतो असा सीन आहे. पण थेट नकार दिल्यास दैवी कोपातून
बाप मरणार अशी भिती पण वाटते. त्यामुळे थेट नकार नाही. पण ७/१२ करुन देण्याची पण
तयारी नाही. या सगळ्या प्रकाराला कंटाळून हा पक्षकार माझ्याकडे आला.
तो सांगत होता. आपली व्यथा मांडत होता. मी
मात्र नविन एक कथा सापडली म्हणून मनातल्या मनात खुष होतो. आता ही गोष्ट लिहून
काढायची म्हणून माझ्या डोक्यात त्याची मांडणी सुरु झाली. अन हा मात्र प्रचंड आशेनी
माझ्या तोंडाकडे पाहात म्हणतो... सर यावर काहितरी उपाय सांगा? म्हटलं काहीच नाही.
महाराची जमीन हडपशील तर दैवी कोपाने मरशील अशी भिती दाखव. जमलं तर जमलं,
नाही तर गेलं. असा सल्ला दिला. कारण या प्रकरणात कायद्याशीर
उपाय नाही आणि सल्लाही नाही.
No comments:
Post a Comment