Showing posts with label पुस्तक परिचय. Show all posts
Showing posts with label पुस्तक परिचय. Show all posts

Wednesday, 28 May 2025

पुस्तक परिचय- बिट्स एन्ड बाईट्स

 बिट्स एन्ड बाईट्स


पुस्तक हाती आले तेंव्हा माझ्या सवयी प्रमाणे आधी मागचे पान वाचून काढले.  लेखिका कोण, काय लिहले वगैरे जुजबी परिचय दिसला. इतर कोणत्याही पुस्तकात असते ते इथेही होते. त्यानंतर पुस्तकातील अर्पण पत्रीका, सुरेश द्वादशिवार यांची प्रस्तावना वगैरे संपवून पुस्तकाच्या मुख्य गाभ्यात आलो. 

हे पुस्तक ४ भागात विभागलेले आहे. त्यातील पहिला भाग आधी-व्याधी, दुसरा भाग कथा-व्यथा, तिसरा भाग वैषम्य लहरी आणि चौथा भाग नाद अनाहद. पुस्तकाचे नाव वाचून काहीच अंदाज येत नाही. अगदी वाचायला सुरुवात केल्यावरही काहीच अंदाज येत नाही. आधी वाटले की हे पुस्तक म्हणजे लघू कथांचे पुस्तक असावे. पण पुढे पुढे सरकत गेल्यावर लक्षात आले की पुस्तकातील लिखाणाचा एकुन बाज हा बातमी कथनाचा आहे. पण आजून पुढे काही लेख वाचल्यावर वाटू लागले की याला थोडी फिलॉसोफीकल किनार असून समाज कल्लोळावर केलेले चिंतन व मंथन आहे. आणि जेंव्हा पुस्तक वाचून संपले तेंव्हा असे वाटू लागले की जगभरातील तात्कालीन संदर्भाना धरुन मांडलेला  हा स्त्री जिवनाचा लेखाजोखा आहे. पण काही वेळ जरा विचार केल्यावर या स्त्री जिवनाच्या लेख्या जोख्या पलिकडॆ आजून काहीतरी आहे असे सारखे वाटू लागले. मी थोडा अधिक विचार केला व नंतर कळले की हे पुस्तत म्हणजे स्त्री जिवनावरील चिंतन मंथनातुन आलेला लेखाजोखा  तर आहेच. पण त्याच बरोबर अजुन एक गोष्ट आहे ती म्हणजे लेखिकेचं लिखान संवेदनाच्या पलिकडॆ जाऊन सहवेदनाच्या टप्यावर गेलय,  हे जाणवल.


काही ठळक घटना

प्रकरण पहिले सुरु होते भयभिताच्या तांड्या पासून... ही सिरीयाची कथा आहे. अनेक प्रकारचे सामाजीक मतभेद, वैचारीक घुसळन, पराकोटीचा विध्वंस आणि अत्याचार यातून जाणारा हा देश. हा देश अनेक पिढ्याच्या हिंसेत  पिसून निघाला तरी धडा न घेणारा सिरीयन समाज, याची ही गाथा आहे. या हिंसाचाराचा सगळ्यात मोठा बळी कोण? हे सांगायची गरज नाहीच. कोणताही समाज लढतो तेंव्हा पहिला बळी स्त्रीचा जातो. इथेही तेच दिसते, पण या पुस्तकात एक नविन बाजू उलगडून मांडली गेली ती म्हणजे स्त्रीयांनी हाती बंदूक घेऊन एक संघर्ष उभा केला, त्याचे कथन आहे. म्हणून हे पुस्तक वेगळे ठरते. खरंतर प्रत्येक लेख एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. असे प्रचंड व अवाढव्य आवाका असलेले विषय छोट्या छोट्या लेखात बांधून तुमच्या पुढे ठेवण्यात आले. त्यामुळे बिट्स अन्ड बाईट्स हे नाव समर्पक ठरते. 


बॅडवॅगन इफेक्ट नावाचा लेख/प्रकरण येतो. त्यात एक मानसशास्त्राचा जो प्रयोग करण्यात आला, तो पुराव्यानीशी  कथन केलाय. घटना अशी आहे की, एका स्त्रीने आपले शरीर लोकांच्या पुढे ठेवले व मनात येईल ते करा अशी सूट दिली. लोकांनी मोकळीक मिळाल्यावर जी विकृती दाखविली ती माणूस म्हणून लाज वाटावी अशी आहे. प्रत्येक माणसात पशू असतो पण  संस्कार व कायदा यांने तो बांधलेला असतो. हे बंधन सैल झाले की तो खरे रुप दाखवतो. त्याची प्रचिती या घट्नेने परत एकदा दिली.  स्वाती मर्डर केस नावाचा पुढील लेख तर भ्याड व बडेजाव करणारा मेनबत्तीछाप समाजाचा बुरखा टराटरा फाड्तो. जेंव्हा धीटाईने पुढे यायची गरज असते तेंव्हा आपला समाज शेपूट घालतो व अत्यंत सुरक्षीत वातावरण लाभले की मेणबेत्ती धरुन लढाईचा आव आणतो. ही लबाडी, आणि दुटप्पीपणा याचा ठाव घेणारा हा लेख वाचून माणूस स्तब्ध होतो. 


यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी माता, त्यांचे शोषण व शासनाची उदासीनता, मुस्लीम महिलांचा पुरोगामी लढा, आत्महत्यांचे उदात्तीकरण पासून तर हाक बलुचिस्तानची ते मामाचं पत्र हरवलं पर्यंतचे विविध समाज अंगाला स्पर्शून जाणा-या लेखांची मालिका एकत्र बांधून आपल्या पुढ्य़ात ठेवली आणि त्याला नाव दिले बिट्स एन्ड बाईट्स. हे पुस्तक चार भागात असून ते पुढील प्रमाणे विविध लोकांशी भेट घालून देते.


वरील महत्वाच्या व ठळक घटना सोडून पुस्तकभर काय आहे? तर त्याचा सार खालील प्रमाणे आहे.

आधी-व्याधी

सिरिया मध्ये बंदुका हाती घेऊन धडधड धडधड धावणा-या बायका या पुस्तकात भेटतात. अरे पण आम्ही तर ऐकलय की सिरियात ते आयसीस वाले बंदुका घेऊन धावतात? हो ते खरच आहे. पण ही दुसरी बाजू पण आहे. ती या पुस्तका सापडते. बॅडवॅगन एफेक्टचा प्रयोग करायला बसलेली बाई आपलं शरीर मुक्तपणे खेळायला बाजारातील चौकात ठेवून दिल्यावर तिच्या शरीराशी खेळणारी सिव्हिलाईज्ड विकृती सुद्धा इथे सापडते. जाती धर्माचा उन्माद व तांडव इथे सापडतो. स्वातीचा मर्डर होताना लपून बसलेला मेणबत्तीछाप समाज, नंतर मोर्चे काढून बडेजाव करताना इथे दिसतो. गरीब व अशिक्षीत पोरींना चुटुर पुटूर पैसे देऊन गर्भवती करणारा व कुमारी मांता म्हणून त्यांना सोडून जाणार पुरुष तर इथे सापडतोच पण त्याच बरोबर उदासीन वृत्तीचा शासकीय बाबू हा सुध्दा इथे दिसतो. याच बरोबर चक्क एक पुरोगामी  मुसलमान महिलांची संघटना इथे भेटते, ज्या बद्दल आपण फारसे कुठेच ऐकलेले नाही अशी संघट्ना प्रत्यक्ष ग्राऊंडवर काम करत असूनही ज्याची आपल्याला भनक नाही ती अचानक इथे सापडते.  हे पुस्तक वाचताना फार फार दुरून एक हाक येते... मदत मागणारी ती हाक... दूर  बलुचिस्तान मधून येते. आपन ऐकत नाही ती गोष्ट वेगळी पण ती येते. अशी ऐकुन न ऐकलेली ती बलुच लोकांची हाक या पुस्तकात सापडते. माणूसकीचा बोन्साय पण भेट्तो... हा काय आहे. मी नाही सांगू शकत काय आहे. तुम्हीच जाऊन वाचा. माझी हिंमतच गडुन पडते हे सांगताना. गगन ठेंगणे करणा-या बायकांची यशोगाथा पण इथे सापडते. साकोलीतील जमीनिचे ७/१२ उतारे ज्यावर घरातील प्रत्येक बाईचे नाव लावले जाते असे एक अवलीया लोकांच गाव पण इथे सापडतं. थोडक्यात या सदरात काही गोष्टी सापडतात तर काही व्यक्ती भेटतात. हे सदर भेटण्याचा व सापड्ण्याचा सदर आहे.


कथा-व्यथा

कथा व्यथा नावाचा दुसरा भाग आहे. त्यात केटीचा रेप व त्यानंतरचा प्रदीर्घ लढा आतून कुरतडून टाकतो. आयसीसच्या लांडग्यांच्या हाती सापडलेली व सेक्स स्लेव म्हणून त्या दहतवाद्यांची वासना शमवत एक झुंझार प्रवास करणारी तरुणी जी थेट लंडन पर्य़ंत जाते व पुढे उभ्या जगाला आपली व्यथा सांगते. ती शूर नादीया इथे सापडते. हरवलेली शरबत गुल नावाची अफगाण सुंदरी जीचे हरवणे सापडणे चालू असते ती इथे सापडते खरी... पण का बाई सापडलीस? असं म्हणावं इतकी तिची दुरावस्था झालेली आहे. ऍसिड अटॅक मध्ये चेहरा विद्रूप झालेली सोनाली मुखर्जी व तिच्यावर जिवापाड प्रेम करणार कलंदर प्रेमी इथे सापडतो. बाह्य सौंदर्याच्या परिभाषेला छेद देत जन्माला आलेली ही प्रेम कथा व सुखाचा संसार लपवून ठेवा, नजर लागेल कोणाची.. असं म्हणावं इतकी गोड कहाणी इथे सापडते.  नऊ हजार दिवसाचा लढा देणारी एक विकृत स्त्री... जी आकांडतांडव करुन लोकांचं आकर्षण ओढवून घेणे यातच धन्य मानणारी व आपल्या उचापतखोर वृत्तीला लढा म्हणून रंगविणारी सुनंदा मोकाशी इथे भेटत. फरक एवढाच की लेखिकेने तिची बाजू मांडताना या पात्राची विकृती झाकली आहे. नागपुरातील एक गुणी निवेदिका, तिच्या सासरच्या लोकांच्या लोभामुळे आयुष्याची होळी होते. अशी एक विदारक कथा इथे मिळते. नववधू म्हणून स्वप्न रंगवून ज्या घरात आली तिथे हुंडाबळी ठरते. फसव्या माणसाशी प्रेम करुन लग्नाच्या पवित्र बंधनात अडकते खरी पण पुढचा माणूस पवित्र नसला की हे पवित्र बंधन कोण्या कामाचे रहात नाही. ती व तिच्या सारख्या पवित्र बंधनात अडकलेल्या व पुढे फरफटत जाणा-या बायका इथे भेटतात. या सदराच्या शेवटी एक पागल चित्रकार भेटतो व गायबही होतो. इतकी सगळी पात्रं इथे भेटतात.


वैषम्य लहरी

हा या पुस्तकातील तिसरा भाग आहे. यात लेखिकेचा थोडासा फिलॉसॉफिकल ऍंगल अधून मधून डोकावत राहतो. नर-मादी पलिकडचा माणूस घडविण्याचा विचार इथे भेटतो. तो शक्य आहे की नाही हा स्वतंत्र विषय आहे. नर किंवा मादीच्या पलिकडे जाऊन माणूस जन्माला घालणारी स्त्री इथे सापडते. २४ तास ऑनलाईनवाला कल्लोळ येथे भेटतो. लेखिकेने त्या कल्लोळाची गच्यांडी धरुन समाचारही घेतला आहे. बेफाम व बेजाबदार पणे गाडी चालविणारे आणि त्यांच्या या बेफिकीरीतून हकनाक बळी जाणारे या बद्दल लेखीकेची राग इथे दिसतो. तसेच कोणताही दोष नसताना अपघाताचा बळी पडलेल्या लोकांबद्दल हळहळ सुध्दा इथे आहे. नव्या पिढीची भाषा, मोठं होणं म्हणजे काय? आत्मपरिक्षन व दुसरा ऍंगल सुध्दा इथे दिसतो. संस्कृती पतनाचा महोत्सव साजरा करुन स्केटींगची गरुडझेप घेणारे नागपुरी पोट्टे जे पायाला चाकं बांधून कन्याकुमारी ते नागपूर असा एकुण २००० किमी चा प्रवास करतात, हे सगळे या पुस्तकात भेटतात. या पुस्तकातून लेखिका तुम्हाला अनेक पात्रांच्या भेटी घडवत नेते. अनेक विषयावर चिंतन मनन करायला लावते. आणि ज्या गोष्टी फक्त बातमी म्हणून ऐकलात व विसरुन गेलात त्याचं गांभीर्य आणि समाजावर होणारं परिणाम याचे जाणीव नव्याने करुन देत जाते. 


नाद अनाहद

हा या पुस्तकातील शेवटचा भाग असुन यात लेखीकेने गुलजार पासून इतर सिने कलाकारांवर लेखन केले आहे. हा सदर फिल्मी लोकं व कलाकार यांच्या बद्दल असल्याने तो प्रत्यक्ष वाचून समरस होण्याचा ज्याचा त्याचा मामला आहे.  

थोडक्यात काय सांगता येईल...

तर हे पुस्तक विविध घटनांचा तात्कालीन वृत्तांत आहे. समाचार आहे. किंवा बातमी आहे असेही म्हणता येईल. हे पुस्तक वाचताना असेही वाट्त राहते की यातील जवळपास ८०% घटना आपणास माहीत आहेत. कधी बातम्यात वाचलेले, किंवा टिव्हीत पाहिलेले किंवा इतर कुठे तरी यांचा संदर्भ आपल्या ऐकण्यात आल्याचे जाणवते. पण हे पुस्तक मात्र नुसतं बातमीछाप मांडणी नाही तर त्या संवेदनशील घटनांची सहवेदनेतून आलेली मांडणी आहे. त्यामुळे हे पुस्तक कायम जवळ बाळगावे. ते संदर्भ पुसट होऊ नयेत म्हणणून केंव्हाही कुठलाही लेख काढून वाचावा अशा स्वरुपात आपल्या हाती देण्यात आले. हे पुस्तक वाचालया तुम्हाला सलगतेची अजिबात गरज नाही. कोणतेही पान काढून वाचा, कधीही वाचा, तुम्ही एकरुप होऊन वाचाल असे पुस्तक आहे.


असे पुस्तक दिल्या बद्दल लेखिका रश्मी मदनकर यांचे आभार व अभिनंदन.