Saturday 27 January 2024

कुळ कायदा व परिचय!

 कुळ कायदा: परिचय

महाराष्ट्रात जमिनीचे अनेक कायदे आहेत. त्यातील एक महत्वाचा कायदा म्हणजेच कुळ कायदा. या कायद्याचं खरं नाव कुळ कायदा नसून ते आहे The Bombay Tenancy And Agricultural Lands Act, 1948 आहे. पुढे बॉंबे गाडून त्यात महाराष्ट्र करण्यात आलं. याचं मराठी भाषांतर साधारणता असा निघतो "महाराष्ट्र  कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम" असा होतो. 

कुळ कायदा मुळात आणण्याचा हेतू काय होता तर जी लोकं एखाद्या मोठ्या जमीनदाराच्या शेतात अनेक वर्षे राबत आहेत. अशा शेत मजूराला तो जी जमीन कसत आहे ती जमीन कायमची देऊन टाकण्याचा कायदा म्हणजेच कुळ कायदा होय. असं का? कारण अनेक सावकार लोकं कवडी मोल भावात शेतक-याच्या जमीनी आपल्या नावे करुन मालकी हक्क बाळगत होती. पण त्या शेतात हे मालक लोकं कधीच राबत नसत. फक्त मालकी हक्क बाळगत असत, पण राबण्याचं काम मात्र शेतमजूरावर असे. त्यामुळे शासनानी असा निर्णय घेतला की हे जे कोणी नामधारी मालक आहेत त्यांची मालकी काढुन घ्यायची व जो खरंखूर राबणारा शेतमजूर आहे त्यास जमीन देऊन टाकणे, मालकी देऊन टाकणे, जमिनीचा अधिकार देऊन टाकणे यासाठीचा कायदा म्हणजेच कुळ कायदा होय.

कुळ: मग प्रश्न असा होता की, कुळ कायद्यातील कुळ म्हणजे काय किंवा कोण? तर त्याचं उत्तर आहे की, एखाद्या जमीन मालकाच्या जमिनीत राबणारा शेतकरी जॊ जमीन मालकास खंडाच्या रुपात मोबदला देतो त्याला या कायद्यान्वये कुळ म्हटले जाते. हा कुळ जमीन मालकाचा नातेवाईक असू नये एवढीच ती अट आहे.

कृषक दिन: कुळ कायदा समजावून घेताना अत्यंत महत्वाची बेस लाईन समजून घेतली पाहिजे ती म्हणजे ०१.०४.१९५७ ही तारीख. ही तारीख कुळ कायद्याचा आत्मा आहे. कारण कुळ कायद्यातील कोणत्याही कलमाचा अभ्यास करायचा झाल्यास तुम्हाला ही तारीख माहीत असणे जरुरी आहे. तर या तारखेला कृषक दिन असे म्हणतात. इंग्रजीत याला टिल्लर डे म्हटले जाते. 

मानीव खरेदीदार: कुळ कायद्यातील वरील तरतुदी नुसार जो माणूस कृषक दिनी एखाद्या शेतात कुळ म्हणून राबत असेल व त्या जमिनीच्या ७/१२ सदरी जर त्याच्या नावाची कुळ म्हणून नोंद असेल तर तो त्या दिवशी म्हणजे कृषक दिनी संबंधीत जमिनीचा मालक बनुन गेलाय. याला आजुन सोप्या भाषेत सांगायचे तर तो अटोमेटीक खरेदीदार बनुन गेलाय. आता त्याच्या मालकी हक्काला कोणी आव्हान देऊ शकत नाही अशी ती तरतूद आहे. 

मूळ मालकाचे मालकी संपणे: कृषक दिनाचा  परिणाम मुळ मालकाच्या मालकी हक्कावर असा होतो की त्याचं मालकी हक्क संपुष्टात येतो. कधी येतो? कृषक दिनी जर त्याच्या ७/१२ सदरी कुळाचे नाव असेल तर त्याच क्षणाला मूळ मालकाचं मालकी हक्क संपुष्टात येतो. म्हणजे त्या नंतर जरी ७/१२ वर मालकाचं नाव दिसत राहिलं किंवा ते कमी केल्या गेलेलं नसेल तरी मात्र मालकी हक्क मूळ मालकाकडे रहात नाही. मग कोणाकडे रहातो? ७/१२ नाव मूळ मालकाचे असते, पण खरी मालकी असते ती कुळाची. 

३२-ग आणि म: मग प्रश्न असा पडतो की, कुळानी मालकाचे नाव कमी करुन आपले नाव कसे घालावे?  कुळ कायद्यात याची तरतूद दिली आहे ती ३२-ग मध्ये. कुळाने ३२ ग चा अर्ज तहसीलदार यांच्या कडे दाखल करायचा असतो. अर्जाची छाननी करुन, मालकाना नॊटीस बजावली जाते. त्यानंतर जमिनीचा मोबदला ठरविला जातो. तो भरला की कुळाचे नाव ७/१२ सदरी घातले जाते. हे करताना मूळ मालकास काही हरकत घ्यावयाची असल्यास ती संधी दिली जाते. हरकतीवर सुनावणी घेऊन अंतीम निर्णय घेतला जातो. 


थोडक्यात कुळ कायदा म्हणजे कसेल त्याची जमीन या तत्वावर जमीन मालका कडून मालकी हक्क काढून घेणे व तो हक्क कसणा-यास देणे यासाठीचा कायदा आहे.