Sunday, 13 April 2025

रेरा चे फ्लॅट

 

रेरा चे फ्लॅट

आपल्या कडे बिल्डर लोकं कोणताही नविन प्रकार बाजारात आणून लोकांची लूट करतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे फ्लॅटस. शहरी भागात जागा घेऊन घर बांधणे शक्य नसल्याने बिल्डर लोकं बहुमजली इमारत बांधुन त्यात फ्लॅट्स काढतात व विकतात. यात दोन प्रकारचे फ्लॅट्स दिसतात. एक म्हणजे रेरा मंजूर इमारती मधील फ्लॅट्स. तर दुसरा प्रकार म्हणजे गुंठेवारची फ्लॅटस. रेराचे फ्लॅट घेणे तसे तौलनिक दृष्ट्या सुरक्षीत व जरा भरवशाचा व्यवहार असतो. फ्लॅट खरेदी करताना दोन गोष्टी पाहणे. रेरा मध्ये फ्लॅट घेत असाल तर वेबसाईत वरुन सर्व दस्त डाऊनलोड करुन तपासू शकता. वकिल नेमल्यास ते अधिक उत्तम पध्दतीने कागदपत्र तपासून सांगू शकतात. पण यातही बेरचदा असे असते की रेरा प्रोजेक्ट मध्ये बिल्डरच्या विरुध्द काही केसेस असतात. पण त्याची पुर्ण माहिती वेबसाईटवर नसते. किंवा बिल्डर म्हणतो की आम्ही ते आलमोस्ट सेटल करत आलोय. तुम्ही काळजी करु नका. पण नंतर पैसे घेऊन बिल्डर प्रोजेक्ट रखडवून ठेवतो. या सर्व गोष्टी तुम्ही वकिल नेमून तपासू शकता. रेराचा प्रोजेक्ट असला तरी तुम्ही काही गोष्टी नक्की तपासा. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे ७/१२ कोणाच्या नावे आहे. त्यात इतर हक्कात काही नोंदी आहेत का? कलम ८४-क आहे का? एखादे भुसंपादन, आरक्षण किंवा वारसांचा काही वाद आहे का? या सर्व गोष्टी सातबारा मध्ये पाहता येतात. त्या गोष्टी तपासून पाहणे. त्याच बरोबर झोन दाखला मागवून तो सुध्दा तपासून पाहणे. तसेच वारसांमध्ये काही वाद आहेत का ते तपासणे. त्याच बरोबर वाटपाचा दावा वगैरे चालू असल्यास जे दावेदार आहेत त्यांचा संबंधीत जमिनीत काय अधिकार आहे? किती हक्क आहे? हे सगळं तपासणे. त्याच बरोबर जरी रेरा प्रोजेक्ट असला तरी संबंधीत प्रोजेक्टर बिल्डरनी लोन घेतले का? त्याची परतफेड करतोय का? हे सर्व तपासावे.

एन.ओ.सी.

बिल्डरनी जर प्रोजेक्टवर लोन घेतले असेल तर तुम्ही फ्लॅट घेताना बिल्डरला असे सांगु शकता की ज्या बॅंकेचे लोन आहे त्या बॅंके कडून बिल्डरनी तुमच्या फ्लॅट साठी एन.ओ.सी. आणावी. म्हणजे उद्या जर बिल्डर पळुन गेला तर संबंधीत बॅंक प्रोजेक्ट ताब्यात घ्यायला येईल. तेंव्हा तुमचा फ्लॅट एन.ओ.सी. असल्यामुळे ताब्यात घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रोजेक्टवर बिल्डनी बॅंक लोन घेतले असल्यास फ्लॅट घेताना तुमच्या फ्लॅट पुरती एन.ओ.सी. घेऊनच पुढील व्यवहार करणे.

 

ताबा: रेरा प्रोजेक्ट मध्ये सगळ्य़ात मोठा घोळ दिसतो तो म्हणजे ताब्याचा. बुकिंगच्या वेळी बिल्डर म्हणतो की अमूक तमूक वेळी ताबा देईन. पण नंतर प्रोजेक्ट पुढे पुढे ढकलणे सुरु होते. अतोनात मनस्ताप होतो. हे होऊ नये म्हणून रेराच्या वेबसाईटवर ताब्याची तारीख काय आहे ते बघणे. आणि तुम्ही करार सही करताना ताब्याची तारीख न चुकता तपासणे. यात फरक असला कि मग घोळ होतो. बरीच लोकं बिल्डर सोबत करार सही करताना आपले नाव, वय, पत्ता व फ्लॅट नंबर नीट आले का पाहतात. बाकीच्या अटी व शर्थी पहात नाही. त्यामुळे भविष्यात अनेक गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. तुम्ही करारा मध्ये ताब्या बद्दल काय लिहले आहे हे न चुकता वाचावे. बरेच बिल्डर इथे खुप अफरातफरी करतात. पुर्ण पैसे मिळाल्या नंतर १२ महिन्यानी ताबा देऊ वगैरे अटी घालून अनेक प्रोजेक्ट अडकलेले आम्ही पाहिले आहेत. आता तर रेरा मध्ये ताब्याची तारीख आधीच सांगावी लागते. बिल्डर लोकं तसं रेराकडे जरूर देतात. पण नंतर प्रोजेक्ट एक्स्टेंड करुन घेतात. त्यामुळे ही तारीख सुध्दा बदलते. याचा फटका बसू नये म्हणून तुम्ही करार करताना ही तारीख नक्की तपासणे.

प्लॉट खरेदीची प्रश्नावली

 

प्लॉट खरेदीची प्रश्नावली

जेंव्हा तुम्ही बिल्डर सोबत प्लॉट घेण्यासाठी बैठक करता तेंव्हा खालील प्रश्न नक्की विचारा. म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही.

 

प्रश्न: बिल्डर यांचे नावे सदर मिळकतीचा ७/१२ आहे का?

उत्तर हो असल्यास प्रश्न संपला. पण नाही असल्यास मग दुसरा प्रश्न येतो. तो म्हणजे जर ७/१२ बिल्डरच्या नावे नसेल तर कोणत्या अधिकारात हा बिल्डर सदर मिळकत विकत आहे? आणि मूळ जमीन मालक उद्या हरकत घेतल्यास आपले पैसे पण गेले आणि जमीन पण गेली. त्यामुळे जर बिल्डर किंवा डेव्हलपर याचे नावे ७/१२ नसल्यास बिल्डरच्या नावे चेक देऊ नये. मुळ मालकाच्या नावे चेक देणे. करारावर सह्या पण मुळ मालकाचे असावेत.

 

प्रश्न : मुळ मालकाशी विकसन करार झाला का?

उत्तर जर हो असेल तर त्याची कॉपी मागून घेणे. दोघात काय करार आहे तो वाचणे. मगच व्यवहार करणे. अन्यथा इथेही फसवणूक होत असते.

 

प्रश्न: बिल्डर आणि जमीन मालक हे पार्टनर किंवा जॉंईंट व्हेन्चर प्रोजेक्ट करत आहेत का?

उत्तर जर हो असेल तर त्याची कॉपी मागून वकिलास दाखविणे. त्यातील अटी शर्थी समजून घेणे. नंतरच व्यवहार करणे.

 

प्रश्न: बिल्डरने प्रोजेक्टवर लोन घेतले आहे का?

उत्तर नाही असल्यास विषय संपला. पण हो असल्यास त्याची कॉपी मागविणे. तसेच तुम्ही व्यवहार करत असल्यास त्या संबंधीत बॅंकेची तुमच्या प्लॉट पुरती एन.ओ.सी. घेणे. उद्या बिल्डरनी लोन चुकते न केल्यास बॅंक जप्ती आणणार. मग तुमच्याकडे एन.ओ.सी. असल्यास तुमचे नुकसान होणार नाही.

 

प्रश्न: बिल्डरने ले-आऊट मंजूर केला का?

उत्तर हो असल्या त्याचा मंजूर ले-आऊट तपासणे. नाही असल्यास अशा ठिकानी प्लॉट घेणे म्हणजे निव्वड रिस्क आहे. बेकायदेशीर बांधकाम करुन पैसे घालवायचे असल्यास घ्या. अन्यथा अशा ठिकाणी प्लॉट घेऊ नये.

 

प्रश्न: बिल्डरनी सर्च रिपोर्ट काढलाय का?

उत्तर हो असल्यास कॉपी मागवून वकिला तर्फे तपासून घेणे. अन्यथा स्वत: वकिल लावुन स्वतंत्र सर्च रिपोर्ट करुन घेणे.

 

प्रश्न: बिल्डरनी जमीन विकत घेतल्यास मुळ मालकास पैसे चुकते केले का?

उत्तर हो असल्यास संबंधीत कागदपत्र तपासणे. कारण बरेच वेळा बिल्डर शेतक-याला अर्धे पैसे देतात. बाकीचे नंतर देतो म्हणून थकबाकी ठेवतात. ते पैसे न देता पळून जातात. मग शेतकरी प्लॉट धारकांच्या विरुध्द केस दाखल करुन मनाई हुकूम घेतो. यामुळे बराच मनस्ताप होतो. थोडक्यात तुम्ही जर प्लॉट विकत घेणार असाल तर वरील प्रक्रीया नीट समजून घ्या. जमिनीचे कागदपत्र तपासून घ्या. नंतरच काय तो व्यवहार करा.

प्लॉट्स आणि ले-आऊट

 

प्लॉट्स आणि ले-आऊट

आजच्या घडिला जमिनीच्या बाबतीत प्रचंड गोंधळ उडविणार विषय जर कुठला असेल तर तो म्हणजे प्लॉट्सचा विषय आहे. लहान गावापासून, उपनगर, ते महानगर कुठेही जा. जिकडे तिकडे प्लॉटींग दिसते. मग हे प्लॉट्स लोकं विकत घेतात, खरेदी दस्त होत नाही. त्यासाठी बिल्डर कुलमुखत्यार पत्र करुन देतो. पैसे घेऊन निघून जातो. मग काही दिवसानी कळते की आपल्या नावे ७/१२ नोंद होणार नाही. आणि ते जर करायचे झाल्यास खरेदी दस्त आवश्यक आहे. मग अनेक लोक बेकायदेशीर घर बांधून तसेच राहू लागतात. १२-१५ वर्षे बेकायदेशीर राहिल्यावर गुंठेवारीची एखादी स्कीम आली की अनेक प्रकारची फाईन भरुन ही घरे नियमाकुल होतात. दरम्यानच्या काळात बेकायदेशीर बांधकाम म्हणून नगर रचना विभागानी किंवा संबंधीत बांधकाम व अतिक्रमण विभागानी बांधकाम पाडल्यास सगळं जातं. अनेक लोकं अशा पध्दतीने रस्त्यावर आलेली आहेत. त्यामुळे प्लॉटिंग ची जमीन नीट समजावुन घेणे जरुरी आहे. कोणताही प्लॉट घेताना बिल्डर कडून किमान खालील ६ कागद मागवून ते एखाद्या वकिला कडून तपासून घ्यावे. ज्या ले आऊट मध्ये तुम्ही प्लॉट घेणार आहात तो ले आऊट मंजूर आहे का? हे तपासावे. तसे असेल तरच तुम्हाला बांधता येते. जर ले आऊट मंजूर नसेल तर तुम्हाला घर बांधायला कधीच परवानगी मिळत नाही. त्यामुळे खालील कागदपत्र एखाद्या वकिला कडून नक्की तपासा.

 

कागदपत्रे :  १) ७/१२ उतारा, २) फेरफार उतारा ३) ले-आऊट ४) झोन दाखला ५) क प्रत आणि ६) सर्च रिपोर्ट. ही ६ कागदपत्र तपासल्या शिवाय कधीच व कोणताच प्लॉट घेऊ नये. अगदी तो प्लॉट एन.ए. व टी.पी. मंजूर असला तरी घेऊन नये. काय असतं या कागदा मध्ये? ते बघू या.

 

१) ७/१२ उतारा: या कागदात जमिनीचा आजचा मालक कोण आहे? एकुण जमीन किती आहे? जमिनीचा प्रकार काय आहे? एखादे आरक्षण पडले आहे का? एखादे भुसंपादन नियोजीत आहे का? एखाद्या बॅंकेचा बोजा आहे का? यातुन एखादा सार्वजनिक रस्ता जातो का? कुळ कायदा वगैरे शेरा पड्ला आहे का? अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ७/१२ उता-यावरुन स्पष्ट होतात. त्यामुळे तुम्ही जो प्लॉट घेता त्याचा ७/१२ उतारा एखाद्या वकिलाकडून नीट तपासून घेणे.

 

२) फेरफार उतारा: हा जो उतारा आहे यावरुन संबंधीत जमीन मुळात कोणाची होती. ती आजच्या मालका कडे कशी आली. वारस हक्काने आल्यास इतर वारस कोण? मग एखादा वारस किंवा बहिणी व आत्याबाई वगैरे यात हक्क राखून आहेत का? किंवा अजून कोणाशी करार मदार झाला का? या सर्व गोष्टींची उकल फेरफारचा अभ्यास केल्यास स्पष्ट होते.

 

३) ले-आऊट: प्लॉट घेताना बिल्डर-डेव्हलपर यांच्या कडून नेहमी ले-आऊट मागून घेणे व त्याची नीट तपासणी करणे. यातुन आपल्याला संबंधीत गटातील सर्व प्लॉट्स, त्याचे क्षेत्र, रस्त, त्यांची रुंदी, इतर मोकळी जागा. बगीचा, मैदान या सर्व बाबी कागदावर स्पष्ट दिसतात. त्याच बरोबर तुमच्या प्लॉट कुठे आहे? त्याच्या चतु: सीमा, जाण्या येण्य़ाचा रस्ता व इतर सर्व माहिती या ले-आऊट मध्ये असते. हा ले-आऊट बांधकाम परवानगी घेताना अत्यंत महत्वाचा कागद ठरतो. तो नसल्यास बांधकाम परवानगी हमकास नाकारली जाते.

 

४) झोन दाखला: तुम्ही ज्या ७/१२ वर प्लॉट घेत आहात ती जमीन कोणत्या झोन मध्ये पड्ते हे पाहणे जरुरी असते. निवासी झोन, इंडस्ट्रीअल झोन, ग्रीन झोन, शेती व ना विकास झोन असे अनेक झोन असतात. यातील निवास झोन किंवा प्रस्तावित निवास झोन असेल तरच तुम्हाला घर बांधण्यास परवानगी मिळते. इतर झोन मध्ये मिळत नाही. गोडाऊन व इंडस्ट्रीअल झोन मध्ये अनेक लोक प्लॉट्स घेऊन फसगत होताना मी पाहिलेले आहे. त्यामुळे त्यातून वाचण्यासाठी झोन दाखला पाहायचा असतो.

 

५)  क-प्रत: हा जो दस्त आहे तो तुमच्या जमिनीच्या चतु:सीमा निश्चित करुन देतो. याला मोजणीचा दाखला असेही म्हणतात. जर हा दाखला नसेल तर शेजारचे जमीन वाले तुमच्या जमिनीच्या सीमांचा वाद उभा करतात. मग आयुष्यभर कोर्ट कचेरी करण्यात जाते. हे होऊ नये असे वाटल्यास क-प्रत नक्की घेणे. त्याची नीट तपासणी करणे.

 

६) सर्च रिपोर्ट: सर्च रिपोर्ट म्हणजे जमिनीची कुंडली असते. ही जमीन मुळात कोणाची होती? वारस कोण होते? मग कोणते दस्त झाले? कोणता करार झाला? कोणाचे नाव कधी आले? कोणी कोणास हस्तांतर केले? वाट्प झाल्यस ते कसे व किती प्रमाणात झाले? आज रोजी या जमिनीचे टाईल कोणाकडे आहे? एखादी कोर्ट केस वगैरे आहे का? या सर्व बाबी सर्च रिपोर्ट मध्ये दिसतात. त्यामुळे प्लॉट घेताना सर्च रिपोर्ट आवश्यक असतो. बरीच लोकं हे न करता प्लॉट घेतात. मग खुप मोठी किंमत मोजावी लागते.

अकृषक जमीन काय प्रकार असतो?

 

अकृषक जमीन काय प्रकार असतो?

मुळात सगळ्य़ा जमिनी या शेत जमिनी असतात. म्हणजेच कृषक असतात. या शेतजमिनीचे पण चार प्रकार असतात. १) बागायत शेतजमीन २) जिरायत शेतजमीन ३) तरी शेतजमीन व ४) वरकस शेतजमीन. या सर्व प्रकारच्या शेतजमिनी या फक्त शेती या कामासाठी वापरायच्या असतात. इतर कामासाठी वापरण्यास बंदी आहे. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे गाव, शहर व महनगरांच्या लगतच्या शेत जमिनी निवासी प्रयोजनार्थ अकृषक करुन वास्तव्यासाठी बांधकाम करता येते. आता अकृषक म्हणजे फक्त वास्तव्यासाठी रुपांतरीत करणे असे नाही. शेत जमिनीचे अकृषक रुपांतरण केले जाते तेंव्हा निवासी प्रयोजनार्थ याच्या व्यतिरिक्त आजून बरेच अकृषक प्रयोजनार्थ रुपांतरीत केले जाते. ते म्हणजेच गोडाऊन-अकृषक, शाळा-अकृषक, उद्योग-अकृषक, हॉस्पिटल-अकृषक, प्ले ग्राऊंड-अकृषक, हॉटेल-अकृषक, मंगल कार्यालय-अकृषक, क्रिडा संकुल-अकृषक, ट्रान्स्पोर्ट-अकृषक किंवा आजून कोणत्याही अशा कामासाठी जे काम कृषी म्ह्णजेच शेतीचे काम नाही अशा कामासाठी शेत जमीन रुपांतरीत केली जाते. त्यालाच संबंधीत अकृषक असे म्हटले जाते. लोकांना असे वाट्ते की अकृषक म्हणजे फक्त रहवासी असावे. पण तसे नसते. अकृषक म्हणजे बिनशेती. पण या बिनशेतीचे अनेक प्रकार असतात. तुम्ही ज्या प्रकारासाठी किंवा कामासाठी बिनशेती मध्ये रुपांतरीत करणार आहात तो तुमच्याशी संबंधीत एन.ए. म्हणजेच नॉन अग्रीकल्चरल असा प्रकार पडतो.

एकर आणि गुंठा

क्षेत्राची मोजमाप

आता अजून एक महत्वाचा विषय म्हणजे जेंव्हा शेत जमीन म्हणतो तेंव्हा महत्वाचा विषय येतो तो म्हणजे याचे क्षेत्र कसे मोजतात? लोकांच्या तोंडात बसलेला शब्द म्हणजे अमूक इतकी एकर शेतजमीन आणि तेवढे गुंठे शेतजमीन असं आपण ऐकतो. पण जर तुम्ही ७/१२ काढुन पाहिल्यास एकर व गुंठा हा प्रकारच दिसत नाही. मग लोकं हे शब्द कुठून आणलेत असा प्रश्न पडतो. हे खूप जुने एकक असून ते आता वापरात नाही. आज घडिला ७/१२ वरील क्षेत्र मोजमाप करण्याचे दोनच एकक आहेत. आर आणि हेक्टर. याचं गणित सोपं आहे. १० मिटरची पट्टी घ्यायची. आणि या पट्टीने उभे १० मिटर आणि आडवे १० मिटर मोजल्यावर जो चौकोन तयार होतो त्याला १ आर असे म्हणतात. त्याचे क्षेत्र किती होते? १० गुणिले १० केल्यास १०० चौरस मिटर एवढे क्षेत्र होते. या १०० चौ. मि. क्षेत्राला १ आर असे म्हणतात. आणि असे १०० आर एकत्र जोडले की त्याला १ हेक्टर असे म्हणतात. इतकं सोपं आहे. पण लोकं मात्र उगीच एकर व गुंठा म्हणून घोळ घालतात व अस्तित्वात नसलेले एकक वापरुन उगीच गोंधळुन जातात. मुळात एकर व गुंठा हे एकक अस्तित्वातच नाहीत. आर आण हेक्टर हेच जमीन मोजण्याचे एकक आहेत. ते वरील प्रमाणे असुन एकदा ते नीट समजले की क्षेत्र समजून घेताना कोणतीच अडचण होत नाही.

मग प्रश्न पडतो की गुंठा काय प्रकार आहे?

त्याचा पण एक मजेदार इतिहास आहे. ब्रिटिशाना भारताची अख्खी जमीन मोजून काढायची होते. त्यासाठी एका अधिका-याची नेमणूक करण्य़ात आली. त्याचे नाव होते Edmund Gunter. हा माणूस जमीन मोजून काढण्यात उस्ताद होता. मग तो आपला सगळा लवाजमा घेऊन भारतात आला. ३३ फुटाची साखळी घेतली आणि उभा देश मोजून काढला. त्या ३३ फुटाच्या साखळीने एक साखळी उभी व एक साखळी आडवी असे मोजल्यावर जो चौकोन तयार होतो तो १०८९ चौरच फुटाचा होता. हा चौकोन म्हणजे एक गुंठा होय. आता याला गुंठा का म्हणतात? कारण साखळीवाला बाबा Gunter होता ना... मग गुंटरनी मोजलेला भुखंड म्हणजे गुंठा. अशा पध्दतीने गुंठा हा शब्द अस्तित्वात आला. आणि मग असे ४० गुंठे एकत्र केले की एक एकर क्षेत्र धरले जायचे. पण नंतर ब्रिटीश गेले आणि गुंटरचा गुंठा पण गेला. पण आपल्या तोंडून मात्र आजूनही गुंठा काही जात नाही. तर असा आहे गुंठ्याचा इतिहास.