Sunday, 13 April 2025

फेरफार म्हणजे काय?

 

फेरफार म्हणजे काय?

जसं आपण सातबारा म्हणजे काय ते समजावून घेतलं तसच फेरफार सुध्दा समजून घेणे जरुरी असते. तारबा-यावर ज्या काही नोंदी येतात त्याचा आधार किंवा स्रोत जो असतो फेरफार असतो. फेरफार शिवाय सातबारा बनूच शकत नाही. म्हणजेच आपण जो सातबारा वाचत असतो त्यातील नामुना १२ च्या नोंदी या थेट घातल्या जातात पण नमुना ७ च्या नोंदी या कायम फेरफार वरुन येतात. मग फेरफार म्हणजे काय? तर फेरफार वही ती वही असते ज्यात गावातील कोणत्याही जमिनीच्या स्वरुपात, मालही हक्कात, किंवा इतर हक्कात काही बदल करायचे झाल्यास हा बदल आधी फेरफार वहित नोंदविला जातो. समजा एकादा मिळकतीत त्या जमिनीच्या मालकाने कर्ज घेतले. तर ज्यांनी कर्ज घेतले त्याच्या ७/१२ च्या इतर हक्कात या कर्जाचा बोजा चढवायचा असतो पण तो थेट चढविला जाऊ शकत नाही. अमूक माणसाने तमूक बॅंकेतुन इतक्या रुपयाचे घेतली अशी तपशीलवार नोंद फेराफार वहित घातली जाते. ही नोंद घालताना नोंदीला अनुक्रमणीका पण दिला जातो. मग या नोंदीचा अंमल ७/१२ वर दिला जातो. हा अंमल देताना फेरफार वहितून कोणत्या नंबरच्या नोंदिवरुन सातबारावर बोजा चढविला हे लगेच कळावे म्हणून फेरफार वहितील संबंधीत अनुक्रमणीका नंबर कंसात लिहला जातो. त्यामुळे जेंव्हा तुम्ही ७/१२ वाचता तेंव्हा जे काही शेरा लिहलेला असतो त्याच्या बाजुला गोल करुन किंवा कंस करुन एक नंबर लिहलेला दिसेल. तो नंबर म्हणजेच फेरफार नंबर. म्हणजेच फेरफार वहितील तो अनुक्रमांक आहे त्यात संबंधीत व्यवहाराचा तपशील आहे. अशाच पद्धतीने जेंव्हा सातबाराच्या मालकी हक्कात वारसनोंद घातली जाते तेंव्हा सुध्दा अशीच प्रक्रीया असते. तुम्हाला ७/१२ वर फक्त एवढीच नोंद दिसते की जुनी वारस यांच्या नावापुढे कंस पडला, म्हणजे ती नावे कमी केलीत. आणि नविन नावे घतल्या गेलीत. पण बाकी तपशील मात्र इथे नसतो. तो काय आहे? अमूक माणूस वारस म्हणून कसा आला? कोणत्या दस्ताने आला? कधी आला ? हा सर्व तपशिल जिथे लिहलेला असतो ती वही म्हणजेच फेरफार वही. आणि फेरफार वहीने ज्या नोंदी घातल्या जाते त्याला सिरियल नंबर असतो. तुमची नोंद ज्या सिरियल नंबरला आहे तो नंबर म्हणजे फेरफार नंबर होय.

सात बारा म्हणजे काय?

 

सात बारा म्हणजे काय?

सात बारा म्हणजे शेत जमिनीचा महसुली कागद होय. खर तर यात नमुना ७ नावाचा एक फॉर्म असतो तर नमुना १२ नावाचा दुसरा फॉर्म असतो. हे दोन फॉर्म एकत्र करुन संबंधीत शेत जमिनीची माहिती महसूल अधिकारी दप्तरी ठेवतात. गरज पडेल तेंव्हा संबंधीत शेतक-यास  या फॉर्मचे उतारे काढून देतात. उतारे काढून देणे म्हणजे त्या फॉर्मवर ज्या नोंदी आहेत त्याची नक्कल करुन देणे. तर यातील नमुना ७ चा जो फॉर्म आहे त्याला मुख्य ३ उभे रकाने असतात. पहिला उभा रकाना हा जमिनीचा प्रकार म्हणजेच १) जिरायत २) बागायत ३) तरी व ४) वरकस यातील कोणता प्रकार आहे त्याची नोंद असते. दुस-या  उभ्या रकान्यात भोगवटादार म्हणजेच बोली भाषेतील मालक याची नोंद असते. तर दिस-या उभ्या रकान्यात मात्र इतर हक्काची नोंद असते. हा जो तिसरा रकाना आहे हा सगळ्यात महत्वाचा रकाना आहे. इतर हक्काच्या नोंदी सहसा खालील प्रमाणे असतात. त्या सात बा-यावर असलेला बोजा, कर्ज, गहाण, कुळाची नोंद, वारसांची नोंद, शासकीय आदेशान्वये एखादे संपादन अपेक्षीत असल्यास त्याची नोंद, हस्तांतरणास बंदीची नोंद, वनिकरणाचा शेरा इत्यादी नोंदी असतात. त्यामुळे कोणताही ७/१२ उतारा तपासताना हा रकाना नीट तपासयचा असतो.

 

त्यानंतर खाली नमुना १२ चा फॉर्म जोडलेला असतो. त्यात मात्र पिकाचे प्रकार  व त्या अनुषंगाने माहिती भरलेली असते. तसेच प्रत्येक वर्षीच्या पिकाची नोंद या फॉर्म मध्ये असते. काही एखाद्या वर्षी तुम्ही पीक जर बदलेले असेल्यास तिथे तशी नोंद येते. त्याच बरोबर पिक घेणारी व्यक्ती कोणी त्रयस्थ जर असेल तर त्याचे नाव मात्र या रकान्यात लिहलेले असते. हल्ली हे बंद झालेय. पण जुने ७/१२ तपासल्यास या उता-यात शेती कोण कसतोय याची नोंद दिसते.

जमीन आणि प्रकार

 

जमिनीची ए.बी.सी.डी.

तसं जमीन सगळ्य़ांकडेच असते(म्हणजे असायची) परंतू जमिनीच्या हक्कांबद्दल अधिकांश लोकांना माहिती अथवा कायदेशीर ज्ञान नसतं. मग या लोकांना कोणीही काहिही स्टोरी सांगतं व त्यांना ते खरं वाटू लागतं, किंवा प्रचंड गोंधळ उडतो. त्यामागे कारण एकच, तुम्हाला जमिनी बद्दल मुलभूत माहिती नसते. मी आज ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो.

जमीनिचा मालक कोण?

अख्या भारतात जमिनीची मालक कोणीच नाही ही गोष्ट सर्वप्रथ मेंदुत कोरून घ्यावी. मग जे जमिनीचे मालक म्हणवतात ते नेमकं कोण आहेत? ते सगळे “भोगवटादार” आहेत. भोगवटादार म्हणजे काय? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६. कलम २(२४) मध्ये “भोगवटा” या शब्दाचा अर्थ कब्जेदार असा दिलेला आहे. म्हणजेच भोगवटादार याचा अर्थ अगदी सरळ व सोप्या भाषेत ताबा बाळगणारा असा होतो. आता तुम्ही आपल्या जमिनीचे/मिळकतीचे कागदं काढून बघा. त्यावर कुठेच मालक असं लिहलेलं नसतं. त्यावर भोगवटादार असं लिहलं असतं व त्यापुढे तुमचं नाव असतं. म्हणजेच ज्याला आपण मालक म्हणतो तो टेक्निकली मालक नसून कब्जेदार असतो. मग मालक कोण असतो? संपुर्ण राज्यातील जमिनीचा मालक सरकार असतो व आपण धारक/कब्जेदार असतो. भोगवटादार हा जमिनीचा कब्जा ठेवतो व त्यातून उत्पादन करतो. त्या बदल्यात सरकारला कर/सिदा/सारा इ. रुपात मोबदला भरत असतो.

जमीन धारणेचा इतिहास

तर जमीन धारणेचा इतिहास काही कमी रंजक नाही. इंग्रजपुर्व काळात भारतात मुघलांचं राज्य होतं व स्थानिक पातळीवर इथले राजे सगळा कारभार पाहात असत. आपल्याकडे आकाऊंटिग व ऑडिटींगची पद्धत फारच कुचकामी होती. वरुन राजे लोकं कोणावरही खुष व्हायचे व जमीनिचा तुकडा इनाम/बक्षीस म्हणून देऊन टाकायचे. हा तुकडा कधी तुकडा असायचा, कधी प्रचंड मोठा जमिनीचा पट्टा असायचा तर कधी अख्ख गावच इनाम देऊन टाकायचे. देशमूख, पाटील व इतर अधिकारपदी असलेल्या लोकांनाही भरभरुन इनामरुपी जमिनी दिलेल्या होत्या. हा सगळा प्रकार शेकडो वर्षे चालू होता.

नंतरच्या काळात हळुच ब्रिटिशांनी देशात शिरकाव केला व एकेक संस्थानांचा ताबा घेत सन १८१८ ला देशातील अखेरचं राज्य ताब्यात घेतलं. पण ते ठरले गोरे साहेब. त्यांना हिशेब पाहिजे होता, अन इकडे कशाचा काही ताळमेळ बसेना. राजे लोकांनी खो-यांनी जमीन इनामी देऊन टाकली होती. शासनकर्ते म्हणून ब्रिटिशांना फारसं उत्पन्न मिळेना. १८१८ ते १८५२ पर्यंत म्हणजेच ३४ वर्षे अभ्यास केल्यावर ब्रिटिशांच्या लक्षात आलं की इथल्या राजे व संस्थानिकांनी लोकांना जमिनी इनामी स्वरुपात देऊन टाकल्या आहेत. त्या परत घेतल्या शिवाय महसूल वाढणे नाही. मग ब्रिटिशांनी इनाम कमिशन नावाचं कमिशन १८५२ रोजी स्थापन केलं. म्हणजे भारतात पहिली रेल्वे धावली त्याच्या बरोबर १ वर्षा आधी. या कमिशनचं काम काय तर समस्त जमीन धारकांना बोलावणे अन विचारणे की “अरे बाबा तुझ्याकडे किती जमीन आहे?” तो सांगणार की इतकी तितकी आहे? मग लगेच दुसरा प्रश्न. बरं ही जमीन तुला कशी मिळाली? तो म्हणणार अमूक राजानी माझ्या पुर्वजांना इनाम दिली. अन मग तिसरा प्रश्न पडायचा तो बाऊन्सर… “ठीक आहे, त्या इनामाचं कागद/सनद दाखव” अन जमीन धारक चक्रावून जायचा. कारण आपल्याकडे इनाम कागदावरच दिलं पाहिजे असा शिरस्त नव्हता. राजा बोले दाडी हाले कारभार होता. कित्येक जमिनी तोंडी इनामी होत्या. आपल्याकडे व्यवहार कागदावर करण्याची प्रथा जरुर होती पण त्यापेक्षाही शब्दाला अधिक मान होता. म्हणून सनदा/बक्षिसपत्र मिळाले असतीलही पण तोंडी व्यवहाराला रुळलेला हा समाज कागद सांभाळून ठेवण्याच्या भानगडीत पडला नाही. अन कमिशननी जो सपाटा लावला त्यात जवळ जवळ ४०% जमीन बिन कागदी निघाली. म्हणजे ही सगळी जमीन आता ब्रिटीश सरकार ताब्यात घेणार. पण जमीन धारकांचा आकाडा इतका मोठा होता की थेट जप्ती चालविल्यास उठाव होण्याची शक्यता होती. मग गो-या साहेबांनी डोकं लावलं नि नविन मार्ग शोधून काढला तो म्हणजे जमीनीचा ताबा तर घ्यायचा पण एकदम नाही. “हळु हळु खायेंगे और थंडा करके खायेंगे” या सुत्रानी चालायचं ठरवलं. त्या प्रमाणे मग ट्प्या ट्प्याने विविध अधिग्रहणाचे कायदे पास करत ही सगळी जमीन ताब्यात घेतली गेली. त्यावर लगान वसूल करणे सुरु झाले. म्हणजे जमिनीचे मालक कोण? ब्रिटीश सरकार. अन शेतकरी कोण? ताबेदार/भोगवटादार.

 

स्वातंत्र्या नंतर

हे सगळं दिडेकशे वर्शे चाललं. सन १९४७ साली गोरे निघून गेले व सत्ता आपल्या हातात आली. आता नेहरु सरकार सत्तेत बसलं अन पहिला प्रश्न पडला तो म्हणजे उत्पन्नाचा. तो वसूल कुठून करायचा? शेतक-याकडून. विविध राज्ये निर्माण झालीत व राज्यांनी जमिनीतून कर वसूल करायचं ठरवलं. मग त्यांनीही तेच केलं. आता ही जमीन नव्या मालकाची म्हणजे भारत सरकार/महाराष्ट्र सरकार या मालकाची होती. शेतक-याने या नविन मालकाकडे कर भरुन जमीनिचा ताबा ठेवण्याचे आदेश निघाले. कर भरणार नसाल तर ताबा सोडा असा तो संकेत होता. म्हणजे सरकार जमीन जप्त करुन घेणार. शेतकरी हवालदिल होता. कर तर भरणे आहेच. कारण जमीन सोडून चालणार नव्हतं. पण पैसाही नव्हता. सरकार पर्यंत ही गोष्ट पोहचायला वेळ लागला नाही. मग सरकारनी स्कीम लॉंन्च केली की जमीन धारक म्हणजेच भोगवटादारांना जमिनीचा ताबा हवा असल्यास दोन प्रकारे ताबा ठेवता येईल एक म्हणजे जुनी शर्थ अन दुसरा प्रकार म्हणजे नवी शर्थ यालाच वर्ग १ आणि वर्ग २ असं म्हटलं जातं.

हा काय प्रकार आहे? तर वर्ग एक(जुनी शर्थ) म्हणजे सन १९५२ मध्ये शेतकरी जो शेतसारा भरत होता त्याच्या ६ पट शेतसारा आणि २० पट असा एकुण २६ पट शेतसारा सरकार दरबारी भरल्यास शेतक-याची (भोगवटादार) जमीन जुनी शर्थ म्हणजेच वर्ग एक मध्ये टाकण्यात येईल व तुम्हाला वर्ग एकचे भोगवटादार बनता येईल. याचा फायदा काय? तर तुमच्या ताब्यावर कोणतेच निर्बंध राहणार नाही. म्हणजेच तुम्ही ही जमीन कोणालाही सहज ट्रान्स्फर करु शकाल. म्हणजेच जमीन या प्रवर्गात असल्यास भोगवटादार सहज बदलता येतो. हस्तांतरणावर बंधने नाहीत. पण तुम्ही जर नुसतच ६ पट शेतसारा भरलात तर तुमची जमीन वर्ग दोन मध्ये टाकण्यात येईल. म्हणजेच हस्तांतरणावर निर्बंध येणार. हस्तांतरण करायचेच झाल्यास कलेक्टर व शासनाची परवानगी लागेल अशी ती भानगड होती. त्या काळात लोकांकडे पैसे कुठे असायचे. कित्येकांनी वर्ग दोनची नोंद करुन घेतली. पुढे जे होईल ते होईल, आता तरी जमीनिचा ताबा मिळतोय तेवढ काय कमी नाही या विचारांनी लोकांनी जमीनी वर्ग दोन मधुन मिळविल्या.

तर हा झाला इतिहास. थोडाक्यात काय तर सर्व जमिनी इनामी वतने होत्या. त्यांचा मालक राजे/ब्रिटीश/सरकार होते व आहेत. जमिनीचा धारक हा भोगवटादार म्हणजेच ताबेदार असतो. सातबा-यावर त्याचं नाव मालक म्हणून नसतो तर भोगवटादार म्हणजेच ताबेदार असं असतं.

याच्यात आजून एक म्हणजे तिसरी बाजू पण आहे. खेड्यापाड्यात ज्याच्या इनामी जमिनी होत्या ते शहरात राहू लागले. कोणीतरी माणूस तिकडे गावात शेतीत राबत होता. काही ठिकाणी तर मालकाचा पत्ताच नव्हता. कागदावर एकाचं नाव पण राबतोय भलताच. शेतसारा पण हा राबणाराच भरतोय. स्वातंत्र्या नंतर जमिनीच्य़ा नीट नोंदी करणे सुरु होते तेंव्हा हे अधिकारी थेट बांधावर जायचे. ताबेदार कोण म्हणून विचारल्यावर तो जो राबत असे पुढे येऊन म्हणायचा “मी सरकार!” मग याचंच नावं लिहुन घेतलं जायचं. मूळ भोगवटादार गेला उडत अन हेच लोकं भोगवटादार बनले. कारण जमीन धारणेचा मुलभूत सिध्दांतच हा आहे की जमिनीची मालकी नागरिकांकडे नाही तर ती सरकारची आहे. नागरिक हे फक्त भोगवटादार असतात, म्हणजेच ताबेदार असतात. त्यामुळे त्या काळात कागदावरचे भोगवटादार उडविले गेले व खरोखर ज्याच्याकडे ताबा आहे त्यांना भोगवटादार बनविले गेले.

याच्यातुनच मग एक अत्यंत क्रांतीकारी व कल्याणकारी कायदा आला, तो म्हणजे कुळ कायदा. कसेल त्याची जमीन या तत्वार हा कायद्या कृषक दिनी नविन पहाट घेऊन आला अन त्यानंतर आपल्या राज्यात एक मोठी क्रांती घडली. त्याचा तपशील कुळ कायदा नावाच्या स्वतंत्र प्रकरणात पाहू या.

Wednesday, 2 April 2025

महाराच्या मांडिवर मुलगा देणे.

 

महाराच्या मांडिवर मुलगा देणे.

==========================

 

मी मावळात वकिल म्हणून काम करतो. त्यामुळे इथल्या अगदी ग्रामणी व खोलवर किंवा मुख्य प्रवाहा पासून दूर असलेला व वास्तव्यास शहरा पासून खूप आत असलेल्या खेड्या पाड्यातील गरीब ब शेतकरी कुटुंबाशी थेट संबंध येतो. हा संबंध केसच्या संदर्भाने येत असल्याने लोक आपली बाजू खरी खरी सांगुन मोकळे होतात. त्यातही मी जमिनीचा वकिल असल्याने जे लोक जमिनीचे वाद घेऊन येतात ते वाद खूप जुने असतात.  थेट १९३० साला पासूनचे ७/१२ उतारे घेऊन लोक माझ्याकडे येतात. याच बरोबर त्याकाळात ज्यांचे ७/१२  उतारे नव्हते ती लोकं कढई पत्रक वगैरे कधी न ऐकलेले दाखल/उतारे घेऊन येतात. त्यामुळे मावळातील वकिली म्हणजे कायद्याची जाण तर असाविच लागते. पण पक्षकाराच्या बाजुनी तो आपल्याला इथल्या जुन्या प्रथा व चालिरीती याची नव्याने तोंड ओळख करुन देत असतो. अशीच एक नव्याने तोंड ओळख झालेली मावळातील प्रथा म्हणजे महराच्या मांडिवर मुलगा देणे.

 

तर किस्सा असा आहे की, एक पक्षकार आला. जातीने पुर्वाश्रमीचा महार. त्यामुळे मी सुरुवात करताना महार वतनाची जमीन व त्या अनुषंगाने वाद असवा हे समिकरण डोक्यात घेऊनच कथन ऐकत होतो. पहिले १५ मिनटं त्यांनी जो काही वाद सांगितला तो सेम टु सेम अनेक केसेस मध्ये असतो अगदी तसाच घिसापिटा, दोन पक्षकारातील वाद होता. त्यामुळे माझ्या डोक्यात केस कशी मांडावी याचे ठोकताळे सुरु झाले. कथा पुढे सरकत होती. १५ मिनटाचे ३० झाले, पुढे ४५ झाले. तरी या कथेच महार वतन हा शब्द काही येईना. म्हटल्ं यार.... हा आजून वतनावर का बोलत नाही. अखेर मी त्याला थांबवून त्याची फाईल हातात घेतली व फेरफार चेक केले. मला रिग्रांटचा फेरफार दिसलाच नाही. मी म्हटलं तुम्ही रिग्रांट केलच नाही का? कारण वतनाची जमीन ही मुळात वर्ग २ ची असते. रिग्रांट करुन घ्यावा लागतो. तो म्हटला नाही सर... मी रिग्रांट कशाला करु?  म्हटलं रिग्रांट केल्याशिवाय तुमचे नाव भोगवटादार म्हणून येणार नाही. तो म्हटला सर गरजच नाही. आता मात्र मी भडकलो... अरे वतनाची जमीन रिग्रांट न करता तुझ्या नावे कशी होईल? हे एवढं सगळं रामायण घडल्यावर आता कुठे हळुच म्हणतो "सर.. ती जमीन वतनाची नाहीच मुळी" आणि आता मात्र माझे कान टवकारले.

 

 

मी डोक्यात जो साचा तयार केला होता. त्यात केस फिट बसवून रटा रटाया उत्तर देऊन केस गुंडाळणार होतो. पण तो साचा ताडकन तुटुन बिखरला. कारण ही केस वतनाची नव्हतीच मुळी. म्हटलं "जमीन वतनाची नही?" नाही सर, ती जमीन वतनाची नाही. म्हटलं "मग कशाची आहे?" आणि तो सांगु लागला. आणि मी आवरुन सावरुन बसलो. कारण आज एका महाराची जमिनीची केस आली पण ती महार वतनाची नव्हती. मावळातील एक वेगळ्याच सामाजिक प्रथेची ती कथा होती. त्यातून जी गुंतागुंत निर्माण झाली त्याचा परिपाक हा व्यथेत झाला. आणि व्यथीत होऊन तो सांगू लागला.

 

सर, आम्ही त्या अमूक गावचे वंशपरंपरेने म्हारकी करणारे महार आहोत. माझ्या अनेक पिढ्या तिथेच त्याच गावी महारकी करत जगत होते. तर आमच्या गावात आणि आसपासच्या गावत जे मराठे व इतर उच्च जातीय लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही महारकई करुन जगत आलो ही एक बाजू. पण दुसरी बाजू अशी की भूत पिशाच्च, किंवा कोणत्या पाप वगैरे प्रकारातून मुकीत मिळविण्याचा मार्ग म्हणून सुध्दा महारांचा वापर केला जायचा. अशातिलच एक प्रथा म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला मुलं बाळं होतात पण ती जर जगत नसतील  तर त्याला मागच्या जन्मीचे पाप समजले जाते. किंवा तुमच्या कुळाला एखादा शाप आहे असे समजले जाते. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे हे झालेले मुलं महाराला दान देऊन टाकायचे. एकदा मुल महाराला दान दिले की ते मुल महाराचे होते. मग मराठ्याचे मुल महाराचे झाले की त्याचा गोत्र व कुळ बदलतो. त्यामुळे मग मराठ्याच्या कुटुंबावर आणि त्याच्या वारसावर जो दैवी कोप होणार होता तो नवजात शिशुवर होत नाही. कारण महाराला दान देल्याने ते मुल आता महार मुल असे. आणि अशा पध्दतिने ते मूल बचावतं.  या प्रथेला महाराच्या मांडिवर मुलगा देणे असे म्हणतात.

 

आज वकिली गुंडाळून मी मस्तपैकी एक कधी न ऐकलेली प्रथा अनुभवत होतो. त्याला अपेक्षीत उत्तर व कायदेशीर सल्ला वगैरे गेला उडत. मी भान हरवून कथा ऐकत होतो आणि तो पुढे बसून ऐकवित होता. माझा एकुण अवतार "अजून सांग, आजून सांग" असा होता. तो मधेच थांबून "सर मग आता काय करु" म्हटल्यावर भानावर येत म्हटलं "अरे च्या आता मला बोलायचं आहे व्हय" म्हटलं थांब दोन मिनिट. ही नविन प्रथा पचायला काही वेळ द्यावा लागला.

 

तर त्याची कथा अशी होती, की याच्या आईच्या मांडिवर मराठा मुलगा बसविला होता. कारण काय तर गावातील मराठा कुटुंबाला म्हणे कुठला एक शाप होता. त्यामुळे मुलं जन्माला आली तरी जगत नव्हती. मग मावळातील प्रथे प्रमाणे महाराच्या मांडिवर मूल देणे हा एकमेव मार्ग होता. मग यांच्या मांडिवर मुलगा देण्यात आला व तो मुलगा जगला. त्या खुषीत महाराचा हक्क म्हणून गावातील त्या मराठा कुटुंबाने यांना २० गुंठे जमीन दान दिली. पण त्या काळात कागद लिहून देणे कोणाच्या गावातच नव्हते. किंवा शब्दाला तेवढे मह्त्व असायचे की कागदाची गरज पडत नव्हती. ताब्याने जमीन यांच्याकडे आली, पण त्याचा ७/१२ मात्र मराठ्याकडेच. हा मांडिवर आलेला मुलगा कुळाचा शाप लागू नये म्हणून मांडिवर घेतलेल्या महार आईच्या अंगा खांद्यावर खेळत मोठा झाला. त्यामुळे लगाव तर होताच पण दैवी कोप होईल याची भिती पण होतीच. या सर्व प्रकारात ५०-५५ वर्षे उलटून गेली. आता मांडिवर आलेला मुलगा आजोबा झालाय. त्याचे मुलं आणि नातवंड खुषाल खेळत आहेत. दैवी कोप वगैरे जुन्या काळातील प्रकार चैन-ब्रेक उप मुळे संपुष्टात आलाय. पुढच्या पिढ्याना दैत्य काही गाठू शकत नाही. एकुण काय तर त्या मराठा कुटुंबाचा फॅमिली ट्री चारो दिशा फैलत गेला. हे सगळं झाली तरी मांडिवर आलेला मुलगा जो आज आजोबा आहे तो मात्र थबकुनच असतो. पण ही गोष्ट पुढच्या पिढीतील सदस्यांची नाही. आपला बाप महाराच्या मांडिवर दिल्यामुळे वाचला याची जाण व भान कुटुंबातील सर्वाना असली तरी या नव्या पिढीचा त्यावर संपुर्ण विश्वासही नाही. पण मांडिवाल्या मुलाच्या शब्दाबाहेर नसल्याने यातील कोणीच माझ्या पक्षकाराशी पंगा घेत नाहीत. ती जमीनही परत मागत नाहीत. पण ७/१२ मात्र माझ्या पक्षकाराच्या नावे करुन देत नाहीत.

 

 

आता माझ्या पक्षकाराचे दुखणे हे की, जमीन तर आपल्या ताब्यात आहे, पण कागद मात्र मराठ्याचे नावे आहे. ७/१२ नावे करुन दे म्हटलं की दुसरी पिढी हळुच अटकाव घालते. दैवी कोपाच्या भितीपोटी चार चौघात, समाजात व इतरही ठिकाणी खुले पणाणे जमीन महाराला दिल्याचे कबुली जरुर देतात. ती जमीन तुच कसून खा असेही म्हणतात.  पण ७/१२ मात्र याच्या नावे करुन देत नाहीत. बदलत्या काळात तेही मावळातील जमीन असल्याने कुठेतरी मनाच्या कोप-यत लोभ हळुच उसळी मारतो व ७/१२ करुन देण्यास रोखतो असा सीन आहे. पण थेट नकार दिल्यास दैवी कोपातून बाप मरणार अशी भिती पण वाटते. त्यामुळे थेट नकार नाही. पण ७/१२ करुन देण्याची पण तयारी नाही. या सगळ्या प्रकाराला कंटाळून हा पक्षकार माझ्याकडे आला.

 

तो सांगत होता. आपली व्यथा मांडत होता. मी मात्र नविन एक कथा सापडली म्हणून मनातल्या मनात खुष होतो. आता ही गोष्ट लिहून काढायची म्हणून माझ्या डोक्यात त्याची मांडणी सुरु झाली. अन हा मात्र प्रचंड आशेनी माझ्या तोंडाकडे पाहात म्हणतो... सर यावर काहितरी उपाय सांगा? म्हटलं काहीच नाही. महाराची जमीन हडपशील तर दैवी कोपाने मरशील अशी भिती दाखव. जमलं तर जमलं,  नाही तर गेलं. असा सल्ला दिला. कारण या प्रकरणात कायद्याशीर उपाय नाही आणि सल्लाही नाही.